मुंबई - मुंबईतील परळ येथे असलेल्या ग्लोबल हॉस्पिटलने लेफ्ट वेंट्रिक्यूलर डिसफंक्शनसह डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी असलेल्या एका कॉम्प्लिकेटेड केसमध्ये अनोख्या प्रकारच्या एडव्हान्स्ड इम्युनोडायग्नोस्टिक्स टेक्निकचा वापर करून हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ३१ वर्षीय फरीद फणसोपकर हे LV (लेफ्ट वेंट्रिक्युलर) डिसफंक्शनसह DCM (डायलेटेड कार्डिओ मायोपॅथी) ने ग्रस्त होते. त्यांच्यावर ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एका ४१ वर्षीय हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला हृदय दिलं आहे. ग्लोबल हॉस्पिटलचे लीड हार्ट ट्रांसप्लांट आणि सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.
डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी “एक तरुण दाता, कमी इस्केमिया वेळ (दाताचा हृदय थांबण्यापासून प्राप्तकर्त्याचा हृदय सुरू होण्यापर्यंतचा काळ), एडव्हान्स्ड HLA व फ्लो सायटोमेट्री क्रॉस मॅचेस आणि चांगली नर्सिंग काळजीमुळे उत्कृष्ट क्लिनिकल परिणाम दिसून आले. फरीदची शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी चांगल्या मल्टि-डिसिप्लिनरी टीमच्या प्रयत्नांमुळे खूप सुरळीत झाली. इम्युनोसप्रेशन आहारापासून द्रव संतुलन, अँटीबायोटिक्स आणि इतर प्रोटोकॉल पर्यंत, मी खूप आनंदी आहे कारण जर यापैकी एकाकडे दुर्लक्ष झाले तर यापैकी काही रूग्णांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात” असं म्हटलं आहे.
फरीदची आई जेहरुनिसा यांनी “जीवनाचा रक्षणकर्ता सर्वशक्तिमान आहे परंतु डॉ. प्रवीण कुलकर्णी आणि ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथील संपूर्ण टीम हे माझ्या मुलासाठी सर्वशक्तिमानाचा हात होते. आज फरीदची जवळजवळ ३ वर्षांपासून बिघडत चाललेली तब्येत चांगली झालेली पाहून मला खूप बरं वाटत आहे. मी दाता कुटुंबाचे अत्यंत आभार मानते कारण त्यांच्याशिवाय हे कधीच शक्य नव्हते. मी सर्वांना अवयव दानाला प्रोत्साहन देण्याची विनंती करते जे अनेकांना नवीन जीवन देईल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला अनेक जीवनात जिवंत ठेवेल” असं म्हटलं आहे.