Join us

अडीच तासांत जिवंत हृदय गुजरातहून मुंबईत, रुग्णाला मिळाले जीवदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:27 IST

अवयवदानाची चळवळ हळूहळू जनमानसात रुजत असली, तरी तो अवयव योग्य वेळेत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते.

मुंबई :

अवयवदानाची चळवळ हळूहळू जनमानसात रुजत असली, तरी तो अवयव योग्य वेळेत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. हृदय हा तर अत्यंत नाजूक अवयव. जलद वहन करण्याबरोबरच त्याची हाताळणीही काळजीपूर्वक करावी लागते. पण, या सर्व अडचणींवर मात करीत अडीच तासांपेक्षा कमी वेळात जिवंत हृदय गुजरातहून मुंबईत आणण्यात यश आले आले. त्यामुळे मंगळवारी एका रुग्णाला जीवनदान मिळाले.

परळच्या ग्लोबल रुग्णालयात एका रुग्णावर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया नियोजित होती. त्यासाठी बडोद्याच्या रुग्णालयात दान करण्यात आलेले हृदय मुंबईत आणले जाणार होते. पण, तीन तासांच्या आत ते शस्त्रक्रियागृहात पोहोचवणे अनिवार्य होते. त्यामुळे हवाईमार्गाचा पर्याय निवडण्यात आला. इंडिगोच्या ६ई-६७३४ या विमानाने जिवंत हृदय मुंबईत आणण्यात आले. त्यासाठी बडोद्याच्या रुग्णालयातून विमानतळापर्यंत आणि मुंबई विमानतळापासून ग्लोबल रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला.- वाहतूक विभागाचा चमू वैद्यकीय तज्ज्ञांसोबत बडोद्याच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधित रुग्णाचे हृदय त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर अवघ्या २ तास २२ मिनिटांत ते मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहात पोहोचवण्यात आले. त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले, अशी माहिती इंडिगोतर्फे देण्यात आली.

टॅग्स :हृदयरोग