पहिल्या टप्प्याची सुनावणी

By Admin | Updated: November 30, 2014 23:17 IST2014-11-30T23:17:08+5:302014-11-30T23:17:08+5:30

विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या (नयना) विकासासाठी सिडकोने तयार केलेल्या पायलट प्रोजेक्टवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर पहिल्या टप्प्याची सुनावणी प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली

Hearing the first phase | पहिल्या टप्प्याची सुनावणी

पहिल्या टप्प्याची सुनावणी

नवी मुंबई : विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या (नयना) विकासासाठी सिडकोने तयार केलेल्या पायलट प्रोजेक्टवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर पहिल्या टप्प्याची सुनावणी प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. सिडकोकडे या प्रकल्पासंबधी एकूण ३९४६ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. यापैकी २७३३ हरकतींवर २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सुनावणी घेण्यात आली.
सीबीडी स्थानकातील नयनाच्या कार्यालयात ही सुनावणी पूर्ण झाली. विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील ६00 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. यात एकूण २७३ गावांचा समावेश आहे. यापैकी २३ गावांसाठी सिडकोने विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यावर १३ आॅगस्टला सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामस्थांची बाजू ऐकून घेण्यासाठी सिडकोने एक नियोजन समिती स्थापन केली आहे. सिडकोच्या पारदर्शकतेवर आक्षेप घेत नेरे गावातील ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी सुनावणीवर बहिष्कार टाकला. अंतरिम विकास आराखड्याबाहेरील क्षेत्रातील तसेच विकास नियंत्रण नियमावली संदर्भातील सूचना व हरकतींवर दुसऱ्या दिवशी सुनावणी घेण्यात आली. तर शनिवारी शेवटच्या दिवशी नेरे आणि केणी गावातील बहुद्देशीय मार्गिका रद्द करणे, इमारतींना तळमजला अधिक सात मजल्यापर्यंतच्या उंचीला परवानगी देणे आदी मुद्द्यांचा विचार करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीच्या तारखा लवकरच करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकासाच्या या प्रारूप आराखड्यात सुधारणा करून अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.