Join us

भाडे थकवल्याने १३ विकासकांविरोधात तक्रार, म्हाडाचे संक्रमण शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 03:45 IST

काही इमारतींचा पुनर्विकास होत असताना यातील रहिवाशांसाठी किंवा प्रकल्प बाधितांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवार्याची सोय म्हणून संक्रमण शिबिरे उभारण्यात येतात.

मुंबई : काही इमारतींचा पुनर्विकास होत असताना यातील रहिवाशांसाठी किंवा प्रकल्प बाधितांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवार्याची सोय म्हणून संक्रमण शिबिरे उभारण्यात येतात. म्हाडाने उभारलेल्या संक्रमण शिबिरांमधील काही गाळे हे विकासकांना भाडेतत्वावर देण्यात आले आहेत, मात्र काही विकासकांनी हे भाडे न भरल्याने ही थकीत रक्कम आता १३५ कोटींच्यावर गेली आहे. यामुळे आता अशा विकासकांवर गुन्हा दाखल करण्यास म्हाडाने सुरुवात केली असून आत्तापर्यंत तेरा विकासकांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.गेल्या वीस वर्षांपासून म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमधील काही गाळे हे विकासकांना देण्यात आले आहेत. विकासकांचे काही भागांमध्ये पुनर्विकास प्रकल्प सुरू असून या प्रकल्पातील रहिवाशांना विकासकांनी या संक्रमण शिबिरामध्ये राहण्यास गाळे उपलब्ध करून दिले आहेत. या रहिवाशांचे भाडे भरण्याची जबाबदारी ही विकासकाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे भाडे न भरल्याने हे भाडे कोट्यांमध्ये पोहचले आहे. हे भाडे भरण्यासाठी म्हाडाने विकासकांना नोटीसाही पाठवल्या आहेत. मात्र तरीही या विकासकांनी भाडे न भरल्याने आता या विकासकांविरोधात कारवाई करण्याचे पाऊल म्हाडाने उचलले आहे. यासाठी आयकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे.

टॅग्स :म्हाडा