पाच वर्षांपासून रखडलेल्या ५३३ प्रकल्पांना नोटीस देत सुनावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 16:20 IST2021-11-26T16:19:13+5:302021-11-26T16:20:02+5:30
मुंबईत अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. तसेच दरवर्षी अनेक इमारती कोसळण्याच्या घटनादेखील घडतात.

पाच वर्षांपासून रखडलेल्या ५३३ प्रकल्पांना नोटीस देत सुनावणी सुरू
मुंबई : मागील पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेले सुमारे ५३३ बांधकाम प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण अशा प्रकल्पांच्या बिल्डर्स आणि सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मुंबईत विविध पुनर्विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईचा पुनर्विकास मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच ट्विट केले की, गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेल्या ५३३ योजनांबाबत सोसायटी आणि विकासकास नोटीस देऊन सुनावणी घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे समस्यांच्या मुळाशी जाण्यास मदत होणार असून, या समस्या निवारण करण्याचे ध्येय साध्य होण्यास मदत होणार आहे.
मुंबईत अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. तसेच दरवर्षी अनेक इमारती कोसळण्याच्या घटनादेखील घडतात. यासाठी मुंबईत अशा इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र, अनेक कारणांमुळे हे पुनर्विकास प्रकल्प रखडले जात आहेत. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पाहता अनेक धोकादायक इमारतींमधील रहिवासी इमारत रिकामी करण्यास टाळाटाळ करतात. काही रहिवासी अनेक दशके संक्रमण शिबिरांमध्येच पडून असल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच सरकारने जलद सुनावणी घेतल्यास ही समस्या संपुष्टात येईल आणि रखडलेल्या प्रकल्पांचा पुनर्विकास पुन्हा सुरू होऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.