Join us  

तंदुरुस्त विमाधारकांना मिळणार ‘बक्षीस’ - आरआरडीएआय; पॉलिसी घेताना सवलतीचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:15 AM

इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे विमा कंपन्यांसाठी जाहीर केली आहेत.

मुंबई : तुम्ही जर नियमित व्यायाम करीत असाल आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी जीम, योग किंवा क्रीडा प्रकारात सहभाग घेत असाल तर विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स किंवा विम्याची रक्कमही वाढवून मिळू शकते. इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे विमा कंपन्यांसाठी जाहीर केली आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण गेल्या तीन-चार महिन्यांत लक्षणीयरीत्या वाढू लागले आहे. तसेच, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना विम्याचे कवच उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयआरडीएआयने हे विशेष धोरण तयार केले आहे. पॉलिसीधारक किती तंदुरुस्त आहे किंवा निरोगी राहण्यासाठी तो किती प्रयत्न करतो, या आधारावर त्यांना सवलती दिल्या जातील. प्रीमियमच्या रकमेत सवलत आणि विम्याची रक्कम वाढवून देण्याबरोबरच जीमचे सदस्यत्व, रुग्णालयांतील आरोग्य तपासण्या, औषधांची खरेदी यांसारख्या अनेक बाबींसाठी सवलतीची व्हाऊचर्स विमा कंपन्या देऊ शकतात.सवलतींचा लाभ वैयक्तिक, कुटुंबाच्या पॉलिसीसाठीही होईल. त्यासाठी विमा कंपन्यांनी आपापली मार्गदर्शक तत्त्वे कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावीत, असे आयआरडीएआयने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :आरोग्य