बाप्पाच्या उत्सवातून आरोग्याचे धडे
By Admin | Updated: August 31, 2015 03:04 IST2015-08-31T03:04:01+5:302015-08-31T03:04:01+5:30
गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करता स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भित्तीपत्रके, प्रदर्शने आयोजित

बाप्पाच्या उत्सवातून आरोग्याचे धडे
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करता स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भित्तीपत्रके, प्रदर्शने आयोजित करून जनजागृती करणार आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली.
स्वाइन फ्लूचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी कस्तूरबा रुग्णालयात एक बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा, सहआरोग्य अधिकारी डॉ. नाईक, उप आरोग्य अधिकारी डॉ. मिनी खेत्रपाल, साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, कस्तूरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले, की स्वाइन फ्लूचे रुग्ण राज्यात वाढत आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. हे टाळण्यासाठी सरकारच्या बरोबरीनेच लोकसहभागही अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्ही सार्वजनिक मंडळांबरोबर बैठका घेऊन जनजागृती करण्याची विनंती त्यांना केली आहे.
स्वाइन फ्लू आणि स्वाइनसदृश आजाराने होणारे मृत्यू यांतील फरक स्पष्ट करणारे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शहानिशा करणारे मृत्यू परीक्षण अहवाल आरोग्य यंत्रणांनी बनवावेत. स्वाइन फ्लू बाधा झाल्याचे प्रयोगशाळांतून जास्त प्रमाणात अहवाल येत असल्यास औषधोपचार सुरू करण्यासोबतच पुन्हा त्या रुग्णांची सरकारी रुग्णालयांत तपासणी करून खातरजमा करावी, असे आदेश त्यांनी दिले. यासंदर्भात स्थानिक वैद्यकीय संघटनांबरोबर परत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईत नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीचा राजा मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आझाद नगर येथील अंधेरी राजाच्या मंडपात गुजरात येथील प्रसिद्ध अंबाजी मातेच्या मंदिराचा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. २५0 कलाकार मेहनत घेत आहेत.
गुजरात-राजस्थान सीमेजवळ वसलेले प्रसिद्ध अंबाजी मातामंदिर देशातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशातील ५१ शक्तिपीठांपैकी हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. दरवर्षी विविध प्रसिद्ध मंदिरांचे हुबेहूब देखावे उभारणारे हे मंडळ सुवर्णमहोत्सवी वर्षात अंबाजी माता मंदिर साकारत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केशव तोंडवलकर यांनी सांगितले.
अंधेरीच्या राजाचा सुवर्णमुकुट बनवण्यासाठी अनेक भक्तांनी सुवर्णदान केले आहे. गणेशचतुर्थीपूर्वी तो तयार होईल, असे सुबोध चिटणीस यांनी सांगितले.
ई-कचऱ्याबाबत जनजागृती
सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान ई-कचऱ्याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. ‘युनिटी फाउंडेशन’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. ई-कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे. मंडळांनी ई-कचरा म्हणजे जुने-बंद पडलेले दूरध्वनी संच, मोबाइल, संगणक, बॅटरी इत्यादी संस्थेला द्यावेत, असे आवाहन केले आहे. त्यानंतर हा ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.