पालिकेची आरोग्य सेवा महागणार?
By Admin | Updated: January 28, 2015 00:48 IST2015-01-28T00:48:26+5:302015-01-28T00:48:26+5:30
महापालिका रुग्णालयामधील क्ष किरण, पॅथॉलॉजी, रक्तपेढी या सुविधांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

पालिकेची आरोग्य सेवा महागणार?
नवी मुंबई : महापालिका रुग्णालयामधील क्ष किरण, पॅथॉलॉजी, रक्तपेढी या सुविधांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे गरिबांसाठीच्या या आरोग्यसेवा महागण्याची शक्यता असून नगरसेवकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू केले आहे. ऐरोली, नेरूळ व बेलापूरमधील रुग्णालयेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी रुग्णांसाठी ‘क्ष किरण विभाग’, पॅथॉलॉजी या महत्त्वाच्या सुविधा खाजगीकरणाच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहेत. यापूर्वी क्ष किरण व इतर सुविधांचे खाजगीकरण केलेलेच आहे. परंतु आता रुग्णवाहिका, शववाहिका, रक्तपेढी सुविधा, रक्त संक्रमणाविषयी इतर सुविधांचे खाजगीकरण केले जाणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. वास्तविक रुग्णवाहिका व शववाहिका ही अत्यंत आवश्यक सुविधा आहे. ती शहरवासीयांसाठी महापालिकेने मोफत पुरविली पाहिजे. परंतु या सुविधेचे खाजगीकरण केल्यामुळे संबंधित ठेकेदार जास्त पैसे वसूल करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रक्तपेढी सुविधेविषयीही सामान्य नागरिकांना त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा व इतर तपासण्या चांगल्या प्रकारे व्हाव्या यासाठी खाजगीकरणाची आवश्यकता असल्याचे कारण महापालिका प्रशासनाने पुढे केले आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ, तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची आजही कमतरता आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्धता होत नाही. त्यामुळे आधी सर्वच रुग्णालयांमध्ये कर्मचा-यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)