Join us

Health: अर्ध्यावरती डाव सोडला... ७००हून अधिक क्षयरुग्णांनी सोडले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2023 12:58 IST

Mumbai : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात ७०० हून अधिक क्षय रुग्णांनी अर्धवट उपचार सोडले आहेत. मुंबईत जानेवारी ते डिसेंबर, २०२२ या काळात एकूण ७६० क्षय रुग्णांनी अर्धवट उपचार सोडून दिले आहेत.

आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आणि समतोल आहार घेतल्यास क्षयविरोधातील पहिला टप्पा यशस्वी होऊ शकतो. थोडे बरे वाटल्यानंतर रुग्णांनी औषध घेणे थांबविणे किंवा औषधांचा प्रभाव कमी झाल्याने एमडीआर-क्षय होण्याची शक्यता असते, त्यामुळे पालिकेकडूनही सातत्याने या रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांना उपचारांच्या प्रवाहात ठेवणे, पोषण आहाराची काळजी घेणे, अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका.

नव्या वर्षात ४ हजार उपचाराधीनपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या ४ हजार २३ क्षय रुग्ण उपचाराधीन आहेत.

घातक एमडीआरचे रुग्ण पाच हजार पार...काही ठरावीक औषधांना दाद न देणारा क्षयरोग म्हणजे एम.डी.आर. ट्युबरक्युलोसिस आणि कुठल्याच औषधांना प्रतिसाद न देणारा म्हणजे टोटल ड्रग रेझिस्टन्ट (टीडीआर) ट्युबरक्युलोसिस हे क्षयरोग निवारणाच्या मार्गातील गंभीर आणि चिंताजनक अडथळे बनत आहेत. 

मागील वर्षभरात निदान झालेल्या एकूण क्षयाच्या रुग्णांमध्ये ५ हजार ५२१ रुग्ण हे एमडीआर क्षय आजाराचे आहेत. टीबी हा बरा होणारा रोग आहे, पण बरेच रुग्ण औषधोपचार घेण्यात नियमितता ठेवत नाहीत. मधेच उपचार सोडून दिल्याने, जंतू औषधाला दाद देत नाहीत. त्यामुळे टीबीचे बऱ्या न होणाऱ्या टीबीमध्ये रूपांतर झालेले असते. यालाच ‘एमडीआर’ म्हणजे ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ म्हणतात. 

 १४ हजारांहून अधिक झाले बरे      क्षयाचे आव्हान मोठे असले, तरी योग्य असे पथ्यपाणी, नेमके उपचार आणि नियमित व्यायाम यांनी क्षय जिंकता येतो. प्रत्येक रुग्णाने योग्य ती काळजी घेतली, तर क्षयाचा प्रसारही थांबविता येतो, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.     टीबीवर प्रभावी औषधोपचार उपलब्ध असून, भारत सरकारच्या सुधारित ‘राष्ट्रीय टीबी नियंत्रण कार्यक्रमा’त सर्वांना ती मोफत पुरविली जातात.     मुंबईत जानेवारी ते डिसेंबर, २०२२ या काळात निदान झालेल्या क्षयाच्या रुग्णांपैकी १४ हजार ५०० रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

टॅग्स :आरोग्यमुंबई