Join us

आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 10:59 IST

मंत्रालयातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले,  कबुतरखान्याबाबतचा न्यायालयाचा निकाल पूर्ण वाचलेला नाही, त्यामुळे  भाष्य करणार नाही. मध्यम मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी जागेचे सूतोवाच केले.  काही दिवसांपूर्वी संजय गांधी  उद्यानात एका जागेचे भूमिपूजन केले आहे. तेथे कबुतरखाना उभारण्यात येत आहे.  

मुंबई : आरोग्य हा सर्वांसाठीच महत्त्वाचा विषय आहे; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखविणे गरजेचे आहे. त्यांनाही पर्यायी जागा मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.मंत्रालयातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले,  कबुतरखान्याबाबतचा न्यायालयाचा निकाल पूर्ण वाचलेला नाही, त्यामुळे  भाष्य करणार नाही. मध्यम मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी जागेचे सूतोवाच केले.  काही दिवसांपूर्वी संजय गांधी  उद्यानात एका जागेचे भूमिपूजन केले आहे. तेथे कबुतरखाना उभारण्यात येत आहे.   न्यायालयाच्या निर्णयानंतर जैन समाजाने नाराजी व्यक्त केली असून, त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.  जैन समाजाचे प्रतिनिधी,  राजेंद्र गुरु जीवदया फाउंडेशनचे अशोक चांदमल यांनी सांगितले,   न्यायालयाचा अंतिम निर्णय  आला नाही.  याबाबत नंतर माहिती देऊ शकेन.  आंदोलनकर्ते नीलेश त्रैवाडिया केवळ, ‘गुरुजी बोलेंगे वैसा करेंगे’, अशी प्रतिक्रिया दिली.  

शिंदेसेनेकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतदादर कबूतरखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सत्ताधारी शिंदेसेनेकडून स्वागत करण्यात आले, तर उद्धवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तटस्थ प्रतिक्रिया दिली. शिंदेसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांनीमुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशाचे स्वागत केले आहे. न्यायालयाला याचे गांभीर्य यापूर्वीही लक्षात आले होते. आता पुन्हा न्यायालयाने अधोरेखित केले, असे त्या म्हणाल्या. उद्धवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर तटस्थ प्रतिक्रिया दिली. आदेश बंधनकारक; पण काय नोंदी, अहवाल दिला, त्याआधारे  निकाल दिला; पण कबुतरांच्या जिवावर उठले, असे मत मांडले.

न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेणारअखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले, आज न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळेल, अशी आमची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. तरीदेखील आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करू. आजच्या न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेऊन अंतिम निर्णयानंतरच पुढील कार्यवाहीचा विचार केला जाईल. गांधी यांनी सर्व जीवदयाप्रेमी, कबुतरप्रेमी आणि जैन समाजातील बांधवांना संयम राखण्याचे व न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले. तसेच जैन समाज सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था उभी करण्यास कटिबद्ध आहे आणि शासन व न्यायालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार असून, त्यानंतर येणाऱ्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

टॅग्स :कबुतरमंगलप्रभात लोढा