Join us  

आरोग्य विमा महागणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 5:57 PM

कोरोनामुळे विमा कंपन्यांना आर्थिक गणित बिघडण्याची भीती

 

मुंबई : कोरोनामुळे आरोग्य विमा क्लेमची संख्या आणि उपचार खर्चांच्या भीतीपोटी हा विमा काढणा-यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. आयआरडीएआयच्या निर्देशानुसार दोन विशेष कोरोना पाँलिसी येत्या काही दिवसांत दाखल होणार आहेत. तसेच, क्लेम अदा करताना उपचार खर्चाला कात्री लावणेसुध्दा कंपन्यांना अवघड जाणार आहे. या सर्व कारणांमुळे आर्थिक घडी बिघडेल अशी भीती विमा कंपन्यांनाही वाटू लागली आहे. त्यामुळे या विमा पाँलिसीच्या प्रिमियमची रक्कम वाढण्याबाबत विमा कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.    

इश्युरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाच्या (आयआरडीएआय) आकडेवारीनुसार देशातील फक्त १९ टक्के लोकांकडे आरोग्य विम्याचे संरक्षण आहे. कोरोनाच्या बरोबरीने त्यावरील उपचार खर्चांची दहशत कमी करण्यासाठी आयआरडीएआयने कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या अल्प मुदतीच्या विमा पाँलिसी ११ जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देशातील विमा कंपन्यांना दिले आहेत. त्यातून जास्तीत जास्त लोकांनी विमा काढावा असा उद्देश आहे. त्याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य विम्याच्या पाँलिसी घेण्यासाठीसुध्दा लगबग सुरू आहे. विद्यमान विम्याची मुदत संपल्यानंतर त्याचे नुतनीकरणही करावे लागते. त्या सर्वच आघाड्यांवर येत्या तीन ते सहा महिन्यांत प्रिमियमची रक्कम ५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यासाठी नियमानुसार आयआरडीएआयची परवानगी क्रमप्राप्त असून तशा हालचाली सुरू असल्याची माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे.     

 

कंपन्यांना वाटणारी धास्ती

खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या गंभीर कोरोनाग्रस्तांवरील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. कन्झुमेबल्सच्या नावाखाली विमा कंपन्या बिलांतील २५ ते ३० टक्के रकमेचा परतावा देत नसली तरी सरासरी क्लेम ६ ते ७ लाखांच्या घरात जात आहेत. तर, कमी गंभीर रुग्णांचे क्लेम सरासरी दोन लाखांपेक्षा जास्त आहेत. कोरोना रुग्णांसाठी जवळपास ३०० कोटी रुपयांचे क्लेम विमा कंपन्यांनी अदा केले आहेत. या रुग्णांची आणि त्यांच्या क्लेमची संख्या येत्या काळात आणखी वाढणार आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी सावध पवित्रा स्वीकारला आहे. विमा कंपन्यांकडून क्लेम अदा करताना विविध खर्चांना कात्री लावली जाते. १ आँक्टोबर २०२० पासून दिल्या जाणा-या आणि १ एप्रिल, २०२१ नंतर नुतनीकरण होणा-या पाँलिसींमध्ये त्या कपातीवर आयआरडीएआयने निर्बंध लागू केले आहेत. मानसिक आजारांवरील उपचारांनाही विम्याचे कवच दिले जाणार आहे. कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या दोन नव्या पाँलिसींमध्येही उपचार खर्चाला कात्री लावता येणार नाही. त्यामुळे विमा कंपन्यांना द्याव्या लागणा-या परताव्यात वाढ होणार आहे. त्यासाठी प्रिमियमच्या रकमांमध्ये वाढ क्रमप्राप्त असल्याचे मत या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई