Join us

राज्यातील आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करणार; आशियाई विकास बँकेचे लाभणार सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या. 

सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते. तसेच दूरसंवाद प्रणालीद्वारे आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी निशांत जैन सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले, कर्करोग निदान व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

विस्तृत नियोजन आराखडा तयार करा फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेल्या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या स्वतंत्र रुग्णालय आवश्यकतेची पडताळणी करावी.  नव्याने रुग्णालय उभारणी गरजेची असलेली ठिकाणे या पद्धतीने वर्गीकरण करून विस्तृत नियोजन आराखडा तयार करावा.  धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे रुग्णालय उभारावे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर कालावधी निश्चित करून शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात पडताळणी करावी. अलिबाग आणि सिंधुदुर्ग शासकीय सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. अमरावती, वाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा स्तरावर आहेत. गुणवत्तेसाठी केंद्राचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.  आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सातारा, चंद्रपूर शासकीय रुग्णालय आणि सर जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. तसेच अवयवदान प्रत्यारोपण संबंधित संस्था निर्माण करण्यात येणार आहेत.

टॅग्स :डॉक्टरदेवेंद्र फडणवीस