कामोठेत रिक्षाचालकांचा ठिय्या

By Admin | Updated: February 17, 2015 00:17 IST2015-02-17T00:17:44+5:302015-02-17T00:17:44+5:30

एनएमएमटी बससेवेमुळे आपल्या मनमानी कमाईला चाप बसल्याने संतापलेल्या कामोठे परिसरातील रिक्षाचालकांनी सोमवारी कुटुंबकबिल्यासह ठिय्या करून सामान्य प्रवाशांना तासभर वेठीस धरले.

The head of the rickshaw driver | कामोठेत रिक्षाचालकांचा ठिय्या

कामोठेत रिक्षाचालकांचा ठिय्या

पनवेल : एनएमएमटी बससेवेमुळे आपल्या मनमानी कमाईला चाप बसल्याने संतापलेल्या कामोठे परिसरातील रिक्षाचालकांनी सोमवारी कुटुंबकबिल्यासह ठिय्या करून सामान्य प्रवाशांना तासभर वेठीस धरले. बससेवा बंद करण्याच्या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधींनी फारसे महत्त्व न दिल्याने या रिक्षाचालकांनी ठाण्यातील धर्मराज्य पक्षाच्या माध्यमातून कामोठे शहरात आंदोलनाचा फार्स केला. यामुळे शहरात काही तास तणाव निर्माण झाला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको केल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले.
धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली कामोठेमधील मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता सोमवारी सकाळी रिक्षाचालकांनी अडवला होता. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून रिक्षाचालकांच्या आडमुठेपणामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एनएमएमटी प्रशासनाने सुरू केलेली बससेवा प्रवाशांच्यादृष्टीने किफायतशीर ठरली आहे, त्यामुळे प्रवासी व प्रवासी संघटना एनएमएमटी प्रशासनाच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. मात्र बससेवेमुळे मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)

चक्का जाममुळे विद्यार्थ्यांचे हाल
रिक्षा चालक संघटनेने कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या आंदोलनाने प्रवाशांना वेठीस धरण्यात आले होते. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून मानसरोवर रेल्वे स्टेशन ते हायवेपर्यंत परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. आंदोलनाच्या ठिकाणी परिवहन बससह खाजगी वाहने आणि स्कूल बसलाही प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे मानसरोवर रेल्वे स्थानक किंवा हायवेवर जाण्यासाठी प्रवाशांना दुपारी कडक उन्हात पायपीट करावी लागली. तर विद्यार्थ्यांनी बसमधून उतरून चालत शाळा गाठली. या मार्गाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे.

प्रवाशांची पायपीट, दुकानदारांचे नुकसान
आंदोलनादरम्यान बससेवा, रिक्षा बंद ठेवण्यात आल्याने अनेक प्रवाशांना पायीच मार्गक्र मण करावे लागले. शहरामध्ये काही दुकाने देखील या आंदोलनादरम्यान बंद करण्यात आली होती. यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. उपायुक्त संजय ऐनपुरे यांनी रिक्षाचालक, एनएमएमटी प्रशासन व सिडको यांच्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी आंदोलनाला स्थगिती दिली.

1आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने सोमवारी कामोठे परिसरातील रिक्षाचालक कुटुंबासमवेत रस्त्यावर उतरले. भर रस्त्यात त्यांनी ठिय्या केला. प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध केला.
2प्रकल्पग्रस्त रिक्षाचालकांच्या हितासाठी सतत लढत राहू, असा इशारा राजे यांनी यावेळी दिला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त संजय ऐनपुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, कामोठ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार हे उपस्थित होते.

Web Title: The head of the rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.