स्वसंरक्षणाचे धडे देणाराच निघाला विकृत; गोवंडीतील धक्कादायक प्रकार
By मनीषा म्हात्रे | Updated: August 17, 2023 13:35 IST2023-08-17T13:34:35+5:302023-08-17T13:35:28+5:30
कराटे शिक्षकाला अटक

स्वसंरक्षणाचे धडे देणाराच निघाला विकृत; गोवंडीतील धक्कादायक प्रकार
मुंबई : मुलीला कुठल्याही प्रसंगात स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून कुटुंबीयांनी तिला लाठी काठीचे क्लासेस लावले. मात्र, स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्याचीच वाईट नजर मुलीवर पडली आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला. मुलीने वेळीच त्याच्या तावडीतून सुटका करत पोलीस ठाणे गाठल्याने हा धक्कायक प्रकार समोर आला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी विनयभंग सह पोक्सोचा गुन्हा नोंदवत, आरोपी कराट शिक्षक प्रविण आहिलाजी रुपवते (३८) याला अटक केली आहे.
गोवंडी परीसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. रूपवते हा घरातच कराटे तसेच लाठी काठीचे क्लासेस घ्यायचा. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार मुलगी स्वातंत्र्यदिन साजरा करून सायंकाळी रूपवतेकडे नेहमीप्रमाणे लाठी काठीच्या शिकवणीसाठी गेली. यावेळी, रूपवतेने शिकविण्याच्या बहाण्याने मुलीसोबत जवळीक साधण्यास सुरुवात केली. मुलीसोबत अश्लील वर्तन करताच मुलीने तेथून पळ काढत घर गाठले.
घडलेल्या प्रकाराने मुलगी घाबरली. तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ मुलीसह पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार, गोवंडी पोलिसांनी विनयभंग सह पोक्सोचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. बुधवारी पहाटे आरोपीला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुलीलाही धक्का बसला आहे. तिचे समुपदेशन करण्यात येत आहे.