कोरोनामृतांना चार लाखांच्या मदतीचा ‘तो’ संदेश खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:49+5:302021-09-02T04:11:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाखांची मदत केली जाणार असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर ...

कोरोनामृतांना चार लाखांच्या मदतीचा ‘तो’ संदेश खोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाखांची मदत केली जाणार असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, हा संदेश पूर्णतः खोटा असून, शासनाकडून अशाप्रकारे कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही.
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संदेश गेल्या पंधरा दिवसांपासून समाजमाध्यमांवर फिरत आहेत. ‘केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, त्यासाठी मदतीचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्रदेखील सोबत जोडले आहे.’ या मेसेजला बळी पडून काही लोकांनी शासकीय कार्यालयांत विचारणा सुरू केली आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य शासनाकडून अशाप्रकारे कोणतीही याेजना जाहीर झालेली नसताना आलेल्या अर्जाला काय उत्तर द्यावे, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
अशी थट्टा का?
कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेकांनी आपल्या कुटुंबाचा आधार, सर्वात जवळची माणसे गमावली. लाखो रुपये खर्च करूनही त्यांना वाचवता आले नाही. कित्येक मुले अनाथ झाली. त्यांना सरकारी आधाराची गरज आहे. या मेसेजमुळे त्यांनी शासकीय कार्यालयांत धाव घेण्यास सुरुवात केली आहे. पण तेथे पोहोचल्यावर अशाप्रकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे असे खोटे संदेश पसरवून फसवणूक का करता, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.
......
अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही
समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या या बनावट संदेशाला बळी पडू नये, तसेच नागरिकांनी आपला वेळ वाया घालवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
.......
अर्जाचे काय करणार?
आपत्ती व्यवस्थापन विभागात अशाप्रकारचे अर्ज येऊ लागल्याने अधिकारीही गोंधळात पडले आहेत. नागरिकांना या बनावट मेसेजची माहिती व्हावी या उद्देशाने अर्जदारांना उलट टपाली उत्तर देण्याबाबत विचार सुरू आहे. कोविड नुकसानीबाबत अशाप्रकारे कोणतीही योजना सध्यातरी नसल्याचे संबंधितांना कळविण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.