Join us

समाजसेवेच्या ध्यासाने ‘तो’ कापतो निराधार, मनोरुग्णांचे केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 05:24 IST

आपण दररोज आरशात पाहून आपल्या चेहºयाची ठेवण नीट ठेवत असतो. मात्र, रस्त्यावरील निराधार, मनोरुग्ण स्वत:कडे कधीच लक्ष देत नाहीत.

मुंबई : समाजसेवेसाठी आणि स्वत:च्या समाधानासाठी एक अवलिया रेल्वे स्थानकांवरील निराधार, मनोरुग्ण, वंचितांचे केस कापून सेवा करतोय. भांडुप पूर्वेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर या अवलियाचे हेअर कटिंग सलून आहे. मागील साडे सहा वर्षांपासून लोकसेवा करून रस्ते, रेल्वे स्थानके अशा ठिकाणांहून ८२३ निराधार, मनोरुग्णांचे केस या अवलियाने कापले आहेत.टिटवाळा येथे राहणारे रवींद्र बिरारी आपला हेअर कटिंगचा व्यवसाय सांभाळून ही समाजसेवा करतात. ते याविषयी सांगतात, ‘एकदा रेल्वे स्थानकावर उभा असताना खूप मोठे केस वाढलेला मनोरुग्ण दिसला. त्याचवेळी माझ्या मनात अशा मनोरुग्ण आणि निराधार लोकांचे केस कापण्याची कल्पना आली. या कामाची सुरुवात करताना पहिल्याच दिवशी एका मनोरुग्णाचा मार खावा लागला. मात्र, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने मी या कामासाठी पुन्हा पुढाकार घेतला. रेल्वे स्थानकावरील निराधार माणसे, मनोरुग्णांना विश्वासात घेऊन, त्यांना खायला देऊन केस कापण्यासाठी राजी करतो. मनोरुग्ण एका ठिकाणी बसत नसल्यामुळे जिथे जातील तिथे त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांचे केस मी कापतो. केस कापल्यानंतर मनोरुग्ण स्वत:चा चेहरा आरशात पाहून हसतो. त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य म्हणजे माझी सर्वांत मोठी कमाई आहे,’ असे बिरारी म्हणाले.आपण दररोज आरशात पाहून आपल्या चेहºयाची ठेवण नीट ठेवत असतो. मात्र, रस्त्यावरील निराधार, मनोरुग्ण स्वत:कडे कधीच लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस वाढून ते विद्रूप दिसतात. अशा लोकांना चांगले रूप देण्यासाठी रवींद्र बिरारी दर दहा दिवसांनी टिटवाळा, बदलापूरपासून विक्रोळीपर्यंतच्या लोकांचे केस कापतात. यामध्ये महिलांचादेखील सहभाग आहे. काही वेळा असाध्य रोगाने आजारी असणाºयांचे केस कापण्याचीही वेळ येते आणि त्यांचा संसर्ग होण्याचीही शक्यता असते. तरीही थोर संतांनी दिलेल्या शिकवणुकीला आचरणात आणत रंजल्या-गांजलेल्यांची मनापासून सेवा करीत राहण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले आहे.

टॅग्स :समाजसेवक