पर्यावरणासाठीही घातकच !
By Admin | Updated: March 16, 2015 03:56 IST2015-03-16T03:56:58+5:302015-03-16T03:56:58+5:30
मनुष्य प्राण्याला बसणारा मोबाइल टॉवरच्या किरणोत्साराचा फटका पर्यावरणातील घटकांनाही बसू शकतो, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे

पर्यावरणासाठीही घातकच !
सचिन लुंगसे, मुंबई
मनुष्य प्राण्याला बसणारा मोबाइल टॉवरच्या किरणोत्साराचा फटका पर्यावरणातील घटकांनाही बसू शकतो, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. विशेषत: पक्ष्यांवर या किरणोत्साराचा दुष्परिणाम होत असल्याचे काही अभ्यास प्रकल्पातून समोर आले आहे. त्यात आता महापालिकेने रिलायन्सला मोकळ्या जागांत ‘फोर जी’ टॉवरसाठी परवानगी दिली आहे. परिणामी हे टॉवर उभे राहिले, तर येथील जैवविविधतेसाठी ते घातक ठरेल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत मोबाइल ग्राहक वाढत असून, कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. शहरात हजारो मोबाइल टॉवर्स आहेत. महापालिकेला त्यापासून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु त्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष दिले जात नाही. अनेक इमारतींच्या गच्चीवर महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाइल टॉवर्सची संख्या मोठी आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
मोबाइल टॉवरमधून होणाऱ्या किरणोत्साराचा दुष्परिणाम वन्यजिवांवर विशेषत: पक्षी आणि मधमाश्यांवर होतो आहे, असे निरीक्षण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मांडले होते. परिणामी एक किलोमीटर परिघात एकापेक्षा जास्त टॉवरला परवानगी देऊ नये, अशी सूचना मंत्रालयाने दूरसंचार विभागाला केली होती. इलेक्ट्रो-मॅग्नेटिक किरणोत्सर्गाचे (ईएमआर) भारतीय प्रमाणक नव्याने निश्चित करण्याची तातडीची गरज आहे, असेही मंत्रालयाने म्हटले होते. शिवाय अस्तित्वात असलेल्या टॉवरची जागा, त्यांची संख्या आणि टॉवरमधून होत असलेल्या किरणोत्साराची माहिती दूरसंचार विभागाने सार्वजनिक करावी, असा सल्ला देखील दिला होता. परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही, हे दुर्दैव आहे.