दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 21, 2025 13:11 IST2025-07-21T13:10:42+5:302025-07-21T13:11:30+5:30
दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत.

दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा
मुंबई :दहिसर म्हणजे मुंबईतील शेवटचे स्टेशन. गेल्या तीन दशकांत दहिसरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. दक्षिण मुंबईतून मराठी माणूस दहिसरला राहायला आला. मात्र, विरारवरून चर्चगेटकडे भरून जाणाऱ्या लोकलमध्ये बसणे दहिसरकरांसाठी एक आव्हानच असते. एवढेच नाही तर दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत.
विविध राजकीय पक्ष, वाहतूक पोलिस आणि महानगर पालिकेकडे स्टेशन परिसरातील समस्या सोडविण्याची वारंवार मागणी करूनही ते कोणी गांभीर्याने घेतलेले नाही. आता महापालिका निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीवेळी मत मागणाऱ्या विविध पक्षांच्या उमेदवारांकडे आम्ही आमच्या समस्या मांडणार आहोत. जो उमेदवार दहिसरकरांच्या समस्या सोडवेल, त्यालाच आम्ही मतदान करणार असल्याचा ठाम निर्धार दहिसरकरांनी केल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी सांगितले.
दहिसर पश्चिमेला म्हात्रेवाडीजवळ लोकमान्य टिळक रोड आहे. येथे मोठ्या प्रमाणात रिक्षा, दुचाकी आणि खासगी वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना चालता येत नाही. दहिसर पूर्वेची स्थितीही फारशी वेगळी नाही. स्टेशनबाहेर असलेला फेरीवाल्यांचा वेढा, रिक्षा चालकांची मनमानी, अवैध पार्किंग ठरलेले आहे. वाहतूक पोलिस आणि पालिका त्याची दखल घेत नाही.
प्रमोद दिघे, अध्यक्ष, म्हात्रेवाडी रेसिडंट वेल्फेअर असोसिएशन