Join us

गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरीवाल्यांचा 'उद्योग' जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:24 IST

महापालिकेच्या शौचालयाबाहेर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी थाटले स्टॉल; पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाचा अतिक्रमणाकडे कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईचे प्रवेशद्वार तसेच देशी-परदेशी पर्यटकांचा राबता असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराला अतिक्रमणांचा आणि फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. महापालिकेच्या सुलभशौचालयाच्या आवारातच विक्रेत्यांनी खाद्यपदार्थांची दुकाने थाटली असून, पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

'गेट वे ऑफ इंडिया' पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी, पार्किंगचा बोजवारा याबरोबरच फेरीवाल्यांचा सुळसुळाट असेच चित्र पाहायला मिळते. पर्यटकांच्या सोयीसाठी येथे पालिकेचे शौचालय असून, त्यासमोरच अगदी खेटून एकाने फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्याकडे कापलेली फळे अशीच उघड्यावर ठेवलेली असतात. या स्टॉलजवळ पाणीपुरीवाल्यानेही बस्तान मांडले आहे.

सध्या उन्हाळा असल्याने सरबत विक्रेतेही येथे स्टॉल लावत आहेत. एकूणच आरोग्यास हानिकारक असे वातावरण असल्याचे इथे फेरफटका मारल्यावर पाहायला मिळते. मात्र, 'गेट वे ऑफ इंडिया'च्या परिसरात स्वस्तात खाद्यपदार्थ मिळण्याची सुविधा नसल्याने इथे येणाऱ्या पर्यटकांना नाइलाजाने या ठिकाणच्या स्टॉलवरच क्षुधाशांती करावी लागते.

२६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला लक्ष्य केले होते. त्यामुळे 'ताज', 'गेट वे'च्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त असतो. मात्र, त्या बाहेर फेरीवाल्यांचा विळखा असतो.

खाऊ गल्लीचा अभाव

मुंबईत अनेक ठिकाणी खाऊ गल्ल्या आहेत. तेथे एका रांगेत खाद्यपदार्थांचे स्टॉल असतात. 'गेट वे' परिसरात मात्र अशा खाऊ गल्लीचा अभाव असल्याने फेरीवाल्यांचे फावत आहे.

पार्किंगचा प्रश्नही बिकट

गेट वे' परिसरात येणाऱ्या तसेच 'ताज'मध्ये जाणाऱ्या पर्यटकांमुळे या परिसरात कायमच वाहनांची मोठी गर्दी असते. मात्र, पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने 'ताज' समोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात. त्यात दुहेरी पार्किंगचे प्रमाण मोठे असते. दुहेरी पार्किंग करणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :मुंबई