मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणात गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील हवाला ऑपरेटर अल्पेश खारा (५४) याला अटक केली आहे. त्याने यामागील मास्टरमाईंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशात पाठविल्याचा संशय आहे. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
टोरेस प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अल्पेशचे नाव समोर येताच पोलिसांकडून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनमधील पसार आरोपींच्या तो संपर्कात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली. यातील आरोपींचेही त्याच्या कार्यालयात ये-जा असल्याचेही तपासात समोर आले. त्याने आतापर्यंत किती रक्कम पाठवली, याबाबत तपास सुरू आहे. टोरेस घोटाळा उघडकीस झाल्यानंतर अल्पेशने हवाला व्यवहाराशी संबंधित सर्व नोंदी, पुरावे नष्ट केल्याची माहितीही आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण २७.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ६.७४ कोटींची रोकड, ४.५३ कोटींचे दागिने आणि टोरेसच्या बँक खात्यातील १५.८४ कोटी रुपयांचा समावेश असून कारवाई सुरू आहे. जप्त कागदपत्रे, आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.
५ हजार गुंतवणूकदार पुढे...आतापर्यंत ५२८९ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीचा आकडा ८३.६३ कोटींवर पोहचला असून तक्रार अर्ज घेण्याचे काम सुरूच असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, तक्रारदारासाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन केला असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले.
‘त्या’ तिजोरीत १७ लाख रोखटोरेसच्या कांदिवली येथील शोरूममध्ये सापडलेल्या दोन तिजोऱ्या उघडण्यात पोलिसांना यश आले असून त्यात सुमारे १७ लाख रुपयांची रोकड हाती लागली आहे.