तुम्हीही सायबर भामट्यांच्या कोर्टात हजर झालात का? डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ऑनलाइन काेर्टाद्वारे लाखोंचा गंडा
By मनीषा म्हात्रे | Updated: April 10, 2025 13:21 IST2025-04-10T13:21:06+5:302025-04-10T13:21:24+5:30
अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत.

तुम्हीही सायबर भामट्यांच्या कोर्टात हजर झालात का? डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ऑनलाइन काेर्टाद्वारे लाखोंचा गंडा
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक झाली आहे. २४ तासांत ऑनलाइन कोर्टात हजर व्हा. नेमकं काय सुरू आहे? हे कळायच्या आत सायबर भामट्यांकडून अटक दाखवत थेट व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन कोर्टात हजर करण्यात आले. याच कोर्ट रूमला खरे समजून भांडूपमधील ८० वर्षीय वृद्धेने ३० लाख रुपये जामिनासाठी भरले. मात्र, हे सुरू असलेले कोर्ट सायबर भामट्यांचे आहे हे समजेपर्यंत पैसे खात्यातून गेले होते. अशाच प्रकारे अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसत आहेत.
भांडूप परिसरात राहणाऱ्या ८० वर्षीय कॅथरीन नवमनी नोक्स यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून सीमकार्डचा गैरवापर केल्याचा आरोप करत मोबाइल बंद होण्याची भीती घातली. पुढे, पोलिस, सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवून मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई करत थेट २४ तासांत कोर्टात हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडीओ कॉल करत कोर्टात हजर केले. न्यायाधीश, पोलिस हवालदार बघून, त्यांनीही ठगाच्या जाळ्यात अडकून आरोपीप्रमाणे पांढरे कपडे घालून सुनावणीला हजर झाल्या. खटला सुरू झाला.
पुढे तत्काळ अटकेची भीती दाखवत जामिनासाठी ३० लाख उकळले. आणखीन पैशांची मागणी होताच, महिला घाबरली. घडलेला प्रकार मुलाला समजताच त्या जाळ्यातून बाहेर पडल्या. भानावर येईपर्यंत बँकेतील जमापुंजीवर ठगांनी डल्ला मारला होता. यापूर्वी न्यायालयाचे पत्र दाखवून फसवणूक सुरू होती. त्यानंतर, अशाप्रकारे कोर्टात खटले सुरू करत पैसे उकळणे सुरू झाल्याने पोलिसांच्याही डोकेदुखीत भर पडली आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणासमोर कायम आहे.
न्यायाधीशांची सही बघून संशय अन्..
भाभा अणुसंशोधन केंद्रातून (बीएआरसी) सेवानिवृत्त ८१ वर्षीय अधिकाऱ्याला मनीलॉण्ड्रिंग आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्यात डिजिटल अटक करत सायबर ठगांनी त्यांच्याकडून ३२ लाख लुटल्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये समोर आला. सायबर ठगाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नावाचे एक पत्र पाठवले होते. त्यावर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सही होती. पण, चंद्रचूड हे निवृत्त झाल्याने तक्रारदार यांना त्या पत्रावर संशय आला. त्यांनी ऑनलाइन शोध घेतला असता त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
...म्हणे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे
वृद्धेला डिजिटल अटक करून त्याच्या बँक खात्यातून सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असल्याची भीती घालून सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी या महिलेची फसवणूक केली. महिला घाबरली, तिने आपला याप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगतच, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, त्यांना पुरावे लागतात, असे सांगितले. त्यांना सीबीआय, सर्वोच्च न्यायालय व तेलंगणा सरकारचा लोगो असलेली पत्र पाठवून पैसे उकळले. एक महिनाभर त्या सायबर ठगांच्या सांगण्यानुसार जगत होत्या.
व्यापाऱ्याला शिक्षा अन् सात कोटींचा फटका...
कापड व्यापाऱ्याची गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गुन्हेगारांनी ७ कोटींची फसवणूक केली. आरोपींनी स्काईपवरील सुनावणीत बोगस सीबीआय कार्यालय, सर्वोच्य न्यायालय तयार केले होते. न्यायमूर्तीची ओळख सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अशी करुन दिली. मात्र त्यांचा चेहरा पाहता आला नाही, असे तक्रारदाराने म्हटले. त्यांनी व्यापाऱ्याला शिक्षा सुनावली. २४ तास त्यांच्यावर पाळत होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली. सव्वा पाच कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले होते.