Join us

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:01 IST

खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजतो. मात्र, या खड्ड्यांची माहिती देणाऱ्या प्रणालीविषयी मुंबईकर अजूनही जागरूक नाहीत की, खड्डे खरोखरच कमी झाले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद झाली. तर २०२४-२५ मध्ये हे प्रमाण १,५४८ पर्यंत घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांनी माहिती द्यावी, अशी पालिकेची अपेक्षा  आहे. खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ॲप तयार विकसित केले आहे. या ॲपवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्याची कार्यवाही केली जाते, असा पालिकेचा दावा आहे. मात्र, या ॲपबाबत मुंबईकर फारसे जागरूक नाहीत.

खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. आतापर्यंत काही भागांतील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तर काही भागांतील कामे अर्धवट आहेत. पावसाळा सुरू झाल्याने कामे थांबवली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या रस्त्यांची कामे कंत्राटदारांना दिली आहेत, त्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदारावर असेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

अशी आहे प्रणाली

खड्ड्यांच्या तक्रारी, खड्ड्यांचे फोटो, नेमके ठिकाण आदी माहिती पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमवर नोंदवता येते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागीय रस्ते अभियंता यांच्याकडून ४८ तासांत या तक्रारींची दखल घेणे अपेक्षित असते.एका अर्थाने त्या कालावधीत खड्डे बुजवले जाणे अपेक्षित असते. ४८ तासांत खड्डा बुजवला न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते.

खड्ड्यांच्या तक्रारींची संख्या

  • २०१९-२०    ६,२७६ 
  • २०२०-२१    १,५५०
  • २०२१-२२    १,६४५
  • २०२२-२३    १,९८८
  • २०२३-२४    १,२४१ 
  • २०२४-२५    १,५४८
टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूकमुंबई महानगरपालिका