टीएमटी कर्मचा-यांवर बडतर्फीची तलवार

By Admin | Updated: December 19, 2014 00:01 IST2014-12-19T00:01:28+5:302014-12-19T00:01:28+5:30

वारंवार दिर्घकालीन रजेवर असलेल्या टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेतील चालक- वाहक यांच्यासह कार्यशाळेतील सुमारे २०० हून अधिक कामचुकार

Hardline Swords on TMT Employees | टीएमटी कर्मचा-यांवर बडतर्फीची तलवार

टीएमटी कर्मचा-यांवर बडतर्फीची तलवार

ठाणे - वारंवार दिर्घकालीन रजेवर असलेल्या टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेतील चालक- वाहक यांच्यासह कार्यशाळेतील सुमारे २०० हून अधिक कामचुकार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. परिवहन सेवेकडून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच तो समितीपुढे सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये वाहकांचा आकडा हा जास्त असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. ही कारवाई झाली तर टीएमटीचे कारभार पुरता कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
सध्या परिवहनचा ताफा गडगडला असतांना आता आपल्या कामचुकार कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या कोलमडली असून त्याला हा कर्मचारीवर्ग देखील हातभार लावत असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या महासभेत करण्यात आला होता. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले तर किमान परिवहनची स्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही यावेळी सूचित करण्यात आले. त्यानुसार ४० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली. परंतु,प्रत्यक्षात ही संख्या १०० हून अधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी २०१० च्या सुमारास अशा प्रकारे कारवाई करुन ५१ कर्मचारी आणि कार्यशाळेतील १४ अशा एकूण ६५ जणांना बडतर्फ करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा २०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे.
परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ९६३ वाहक आणि ८१९ चालक आहेत. यात सद्यस्थितीला दांडी बहाद्दर वाहकांची संख्या ही १०० हून अधिक असून त्यातील दिर्घकालीन रजेवरील वाहकांची संख्या ही आजच्या घडीला जवळ - जवळ ४० च्या आसपास आहे. तसेच दुसरीकडे दांडीबहाद्दर चालकांची संख्या देखील १०० च्या आसपास असून त्यातील दिर्घ कालीन म्हणजेच तीन महिन्याहून अधिक काळ गैरहजर राहणाऱ्यांची संख्या सुमारे ८० च्या घरात आहे. परंतु, आता परिवहनने सुरुवातीला चौकशी करुन जो प्रस्ताव पुढे आणला आहे. त्यात वाहकांची संख्या ही अधिक असल्याची माहिती परिवहनने दिली आहे.
सध्या पहिल्या टप्यात ५० जणांचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती परिवहनचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी लोकमतला दिली. तसेच २५ जणांच्या चौकशीचे प्रकरण अंतिम टप्यात आहे. या व्यतिरिक्त १० ते १५ कर्मचारी हे वैद्यकीयदृष्ट्या अनफीट आहेत. कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम परिवहनच्या वाहतूक विभागाकडून सुरु आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी परिवहनच्या ताफ्यात २२० बसना साधारणपणे ८०० च्या आसपास कर्मचारी पुरेसे असा निष्कर्ष काढून कारवाई केली होती. आता परिवहनने जी यादी तयार केली आहे, त्यात २०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hardline Swords on TMT Employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.