Join us  

झोपडपट्टीला लागलेल्या आगीमुळे वांद्रे स्थानकातून हार्बर रेल्वेची वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 4:44 PM

अग्निशमन दलाच्या बारा गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाने  लेव्हल 4 ची आग घोषित केली आहे. 

मुंबई - वांद्रे रेल्वे स्टेशनजवळील बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे वांद्रे रेल्वे स्थानकातून होणारी हार्बर रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या बारा गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाने  लेव्हल 4 ची आग घोषित केली आहे. 

अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली. लांबून धुराचे लोट आकाशात जातान दिसत आहेत. महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु असताना ही आग भडकली. बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर असून अनेक झोपडया वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून आहेत. 

अग्निशमन दलाच्या बारा गाडयांसह तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सध्या तरी या आगीमध्ये कोणतिही जिवीतहानी झालेली नाही. वांद्रयातील भाभा आणि व्ही.एन.देसाईल हॉस्पिटलला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :आग