हार्बर रेल्वे दोन तास कोलमडली
By Admin | Updated: September 5, 2015 02:21 IST2015-09-05T02:21:17+5:302015-09-05T02:21:17+5:30
मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइन आणि हार्बरवर तांत्रिक बिघाड सातत्याने होत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी अशाच एका घटनेमुळे हार्बर रेल्वे दोन तास कोलमडली

हार्बर रेल्वे दोन तास कोलमडली
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइन आणि हार्बरवर तांत्रिक बिघाड सातत्याने होत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी अशाच एका घटनेमुळे हार्बर रेल्वे दोन तास कोलमडली. सकाळी सीएसटीकडे जाणाऱ्या वाशी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. चुनाभट्टी स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे ५0पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
वाशी-सीएसटी लोकल सकाळी ८च्या सुमारास चुनाभट्टी स्थानकात आली. ही लोकल येताच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे या लोकलच्या गार्डला निदर्शनास आले. १५ मिनिटे झाल्यानंतरही लोकलमधील बिघाड दुरुस्त होत नसल्याने सव्वा आठ वाजल्यापासून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला; आणि अनेकांना बराच वेळ स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले होते.
लोकलच्या एका डब्याच्या खालच्या बाजूला आधार देणारी एक स्प्रिंग तुटली (बोल्स्टर प्लँक). ही बाब लोकलच्या गार्डच्या लक्षात आली आणि त्याने त्वरित सगळी सूत्रे हलवली. याची माहिती स्टेशन मास्तर आणि अन्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. लोकलमधील बिघाड वेळीच निदर्शनास आला नसता तर प्रसंगी एखाद्या अपघातालाही तोंड द्यावे लागले असते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
वाशी ते सीएसटीदरम्यानच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल येत नसल्याचे काही कारणही रेल्वेकडून सांगितले जात नसल्याने प्रवाशांमध्ये मात्र संताप व्यक्त केला जात होता.