पुढच्या वर्षी हार्बर सुसाट

By Admin | Updated: August 28, 2015 02:25 IST2015-08-28T02:25:18+5:302015-08-28T02:25:18+5:30

हार्बरवरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मार्च २0१६ पर्यंत डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढेल

Harbor next year next year | पुढच्या वर्षी हार्बर सुसाट

पुढच्या वर्षी हार्बर सुसाट

मुंबई : हार्बरवरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मार्च २0१६ पर्यंत डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढेल, अशी माहीती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर नविन लोकलही हार्बरवासियांना मिळेल. मध्य रेल्वेवरील मेन लाईनवर हे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवर डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम फेब्रुवारी २0१२ मध्ये पूर्ण करण्यात आले. त्यानंतर २0१४ च्या डिसेंबरमध्ये मध्य रेल्वेवरील सीएसटी ते ठाणेपर्यंत हे परिवर्तन पूर्ण केले गेले. या कामामुळे लोकलचा वेग ताशी १00 किमीपर्यंत वाढण्यास मदत मिळत आहे. शिवाय ऊर्जेचीही बचत होत आहे. तसेच नविन लोकल धावण्यासही मदत मिळत आहे. या दोन्ही मार्गांवर परिवर्तनाचे काम पूर्ण करण्यात आले असतानाच हार्बरवर मात्र अद्याप हे काम बाकी आहे. त्यामुळे मार्च २0१६ पर्यंत हार्बरवरील कामही पूर्ण करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. त्यामुळे एप्रिल २0१६ पासून लोकलचा वेग ताशी १00 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

मोनोसाठी १२ दिवस आस्ते कदम
वडाळा ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत मोनो रेलचे काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. मोनोसाठी करी रोड स्थानकाजवळ गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून त्यामुळे तब्बल १२ दिवस लोकलचा वेग मंदावणार आहे. हे काम सप्टेंबरमध्ये केले जाईल.
मोनो रेलचे वडाळा ते संत गाडगे महाराज चौकापर्यंतचे काम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. गर्डर टाकण्याचे काम १ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. गर्डर टाकण्याचे काम सुरुवातीच्या एक ते दोन दिवसांतच पूर्ण करण्यात येईल.
मात्र खबरदारीचा उपाय म्हणून १२ सप्टेंबरपर्यंत लोकलच्या वेगावर मर्यादा येतील. करी रोड स्थानकादरम्यान वेगमर्यादा आखून देण्यात येणार आहे. धीम्या लोकलसाठी ताशी ३० आणि जलद लोकलसाठी ताशी ६० किमी वेगमर्यादा असणार आहे. सप्टेंबरचे सुरुवातीचे १२ दिवस या कामासाठी निवडण्यात आले आहेत. यात काही बदल होण्याची शक्यताही असल्याचे सांगण्यात आले.

हार्बरच्या वाट्याला सिमेन्स लोकलच!
पश्चिम रेल्वे मार्गावर सर्व नव्या बंबार्डियर लोकल चालवण्यात येणार आहेत. त्याऐवजी पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला मिळतील. यातीलच काही लोकल हार्बरवर डीसी-एसी परिवर्तनानंतर चालवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

गणपतीत एसी डबल डेकर नाही
मध्य रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात पनवेल-चिपळूणसाठी डेमू ट्रेन चालवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र एसी डबल डेकर ट्रेन धावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परळ टर्मिनसचे काम डिसेंबरपासून
दादर स्थानकावरील लोकल
गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी परळ टर्मिनस बांधण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल. डिसेंबरपासून टर्मिनसचे काम सुरू केले जाईल, अशी माहीती झा यांनी दिली. हा सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग प्रकल्पाचाच भाग असून परळ टर्मिनससाठी ८0 कोटी रुपये खर्च येणार आहे. पाचवा-सहावा मार्गात जमीन अधिग्रहणाची समस्या येत आहे. सीएसटी ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान सर्वात जास्त समस्या असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Harbor next year next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.