हार्बरवासीयांची रखडपट्टी सुरूच
By Admin | Updated: May 14, 2015 01:20 IST2015-05-14T01:20:16+5:302015-05-14T01:20:16+5:30
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर अनेक नव्या सोयी-सुविधांचा वर्षाव होत असतानाच हार्बरवासीय मात्र त्यापासून वंचितच राहत आहेत.

हार्बरवासीयांची रखडपट्टी सुरूच
सुशांत मोरे, मुंबई
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर अनेक नव्या सोयी-सुविधांचा वर्षाव होत असतानाच हार्बरवासीय मात्र त्यापासून वंचितच राहत आहेत. बारा डबा हार्बरवर धावण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाची कामे जरी काही महिन्यांत पूर्ण झाली तरी सध्याच्या नऊ डबा लोकल बारा डबा करण्यासाठी जादा डबेच उपलब्ध नसल्याने या लोकल धावणार कशा, असा प्रश्न एमआरव्हीसीकडूनच उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बरवासीयांची नव्या प्रकल्पांबाबत रखडपट्टी सुरूच राहणार असल्याचे समोर आले आहे.
मध्य रेल्वेची मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नऊ डबा लोकल बारा डबा करण्यात आल्याने या मार्गावर प्रवाशांचा प्रवास सुकर झाला असून अतिरिक्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढली आहे. तसेच मध्य रेल्वे मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर पंधरा डबा लोकलही धावत असून आणखी पंधरा डबा लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच हार्बरवासीय मात्र यापासून वंचित राहिलेले आहेत. मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेप्रमाणेच हार्बरवरही बारा डबा लोकल सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी हार्बरवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. ही मागणी पाहता बारा डबा चालविण्याचा निर्णय घेत एमआरव्हीसीने गेल्या एक वर्षापासून प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. मात्र सीएसटी आणि वडाळा वगळता हार्बरवरील अन्य प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत तर अन्य छोटी कामे बाकी आहेत.
सीएसटी आणि वडाळा स्थानकात प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यास अडचणी येत असल्याने त्यांची कामे पूर्ण होण्यास थोडा उशीर लागेल, असे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. सीएसटी स्थानकात हार्बरसाठी दोन प्लॅटफॉर्म असून या दोन्ही प्लॅटफॉर्मची कामे करताना तर मध्य रेल्वेला काही दिवसांचा मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच हे काम पूर्ण होईल. मात्र ही कामे पूर्ण करण्यास डिसेंबर २0१५ उजाडणार असला तरी अन्य छोटी कामे करण्यास थोडा अवधी लागणार आहे. परंतु ही कामे जरी पूर्ण झाली तरी प्रत्यक्षात हार्बरवर बारा डबा लोकल धावण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त डब्यांची गरज आहे. साधारणपणे सव्वाशे डब्यांची गरज असून हे डबे आणायचे कुठून, असा प्रश्न एमआरव्हीसीला पडला आहे. हे डबे उपलब्ध झाल्याशिवाय हार्बरवर बारा डबा धावणे अशक्य असल्याचे एमआरव्हीसीचे अधिकारी सांगतात.