रुळाला तडा गेल्याने हार्बर ठप्प
By Admin | Updated: September 21, 2015 02:30 IST2015-09-21T02:30:28+5:302015-09-21T02:30:28+5:30
हार्बर रेल्वेमार्गावरील किंग्ज सर्कल - माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने रविवारी सायंकाळी या मार्गावरील वाहतूक २0 मिनिटे ठप्प झाली होती

रुळाला तडा गेल्याने हार्बर ठप्प
मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावरील किंग्ज सर्कल - माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने रविवारी सायंकाळी या मार्गावरील वाहतूक २0 मिनिटे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. गेल्या आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने रेल्वेने अपघाताची मालिका कायम राखली आहे.
सोमवारी हार्बर रेल्वेमार्गावर रुळाला तडा गेल्याने आणि त्यानंतर मंगळवारी पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी-विले पार्ले स्थानकादरम्यान डबे घरल्याने मुंबईची वाहतूक मंदावली होती. यादरम्यान चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास किंग्ज सर्कल ते माहीमदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही.
रुळाला तडा गेल्यामुळे सीएसटीहून वांद्रे स्थानकाकडे जाणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या. रुळाला तडा गेल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कर्मचाऱ्यांनी रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेत ते २0 मिनिटांमध्ये पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ६ वाजून ५0 मिनिटांनी पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, रविवार आणि गणेशोत्सव असल्याने कुटुंबासह घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा
लागला.