Join us

हॅप्पी बर्थ डे मांडवी एक्स्प्रेस, सीएसएमटी येथे २६ वा वाढदिवस जल्लोषात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:33 IST

Mandovi Express: रेल्वेप्रेमी तसेच प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई-मडगाव या मांडवी एक्स्प्रेसचा २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शनिवारी सकाळी रेल्वेप्रेमींनी जल्लोषात साजरा केला.

मुंबई - रेल्वेप्रेमी तसेच प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई-मडगाव या मांडवी एक्स्प्रेसचा २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शनिवारी सकाळी रेल्वेप्रेमींनी जल्लोषात साजरा केला.

रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ वाजता मडगावहून कोकणकन्या एक्स्प्रेस मुंबईत आल्यानंतर तिचे काही डबेही सजवण्यात आले.

चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात ट्रेनला इंजिन जोडण्यात आले. ट्रेनचे लोको पायलट व साहायक लोको पायलट, तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.

चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी यासाठी मेहनत घेतली.

यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या संबंधित विभागांचे सहकार्य लाभले.

१ जुलै १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाली. मुंबई-गोवा मार्गावर दिवसा सेवा देणारी ही पहिलीच ट्रेन होती. गेज बदलण्यापूर्वी मिरज-वास्कोदरम्यान मांडवी एक्स्प्रेस धावत होती. परंतु, ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली. मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसचे नामकरण मांडवी एक्स्प्रेस म्हणून करण्यात आले.

टॅग्स :कोकण रेल्वे