Join us

तानसा मुख्य जलवाहिनीची हाेणार दुरुस्ती; खोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:12 IST

१८ नोव्हेंबर रोजी जलवाहिनीला गळती असल्याची, रस्ता खचल्याची माहिती मिळताच जलखात्याने दुरुस्तीकाम सुरू केले हाेते.

मुंबई : दीपक सिनेमाजवळील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे ब्रिटिशकालीन १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीवरील मोठी गळती दुरुस्त करण्याचे काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येईल. २ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यानंतर जलवाहिनीवरील मुख्य झडपा बंद करून दोन्हीही मॅनहोल कापून, जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढले जाईल. जलवाहिनीच्या आत शिरून पूर्ण निरीक्षण केले जाईल. गळतीमुळे जलवाहिनीचे किती नुकसान झाले, किती ठिकाणी गळती आहे, त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार दुरुस्ती कामाला सुरुवात हाेईल.

१८ नोव्हेंबर रोजी जलवाहिनीला गळती असल्याची, रस्ता खचल्याची माहिती मिळताच जलखात्याने दुरुस्तीकाम सुरू केले हाेते. गळतीचा शोध लागल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती केली. आता मूळ दुरुस्ती करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून, जमिनीच्या खाली, जलवाहिनीच्या आत शिरून दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याने हे काम आव्हानात्मक आहे. दुरुस्तीसाठी दुसरा खड्डा खोदण्यात आला असून १५ ते २० फूट खोलवर खोदकाम पूर्ण झाले. शोअरिंग प्लेट्स खड्ड्याच्या बाजूंनी लावून खड्डा सुरक्षित करण्यात आला.

जलवाहिनीवर २४ इंचांचे दोन मॅनहोल ड्राय वेल्डिंग करून बसविले आहेत. एका मॅनहोलद्वारे जलवाहिनीच्या आतील पाण्याचा उपसा सबमर्सिबल पंपाने करून दुसऱ्या मॅनहोलमधून कामगारांना, पंपांचा अडथळा न येता आत शिरून दुरुस्ती सहजपणे करता येईल, अशा प्रकारचे नियाेजन आहे.

असे केले सुरुवातीचे काम

  • गळती शोधक पथकाने अल्ट्रासाऊंडिंग रॉड पद्धतीने निश्चित केलेल्या ठिकाणी खोदकाम केले.
  • २ ते ३ दिवस खोदकाम सुरू होते.
  • उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांचा खोदकामात अडथळा होता.
  • खोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते.
  • काम करताना पाणीपुरवठा बंद केला नव्हता. 

गळती राेखल्यानंतर पुढील कामाचे नियाेजन

  • २५ ते ३० फूट खोदकाम
  • मोठी गळती निदर्शनास आली.
  • गळतीच्या ठिकाणी प्रथम लाकडी पाचर ठोकले
  • त्यावर एम.एस. पॅच स्क्रू जॅकच्या साहाय्याने गळती रोखण्यात आली.
  • कठीण पाषाण असल्याने आता २ डिसेंबर रोजी दुरुस्ती हाती घेतली.