Join us  

मेट्रोच्या डब्यांमध्ये असणार दिव्यांगांसाठी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 1:18 AM

या वर्षांच्या अखेरपर्यंत मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

मुंबई : सन २०२६ पर्यंत मुंबई आणि मुंबई लगतच्या भागांमध्ये मेट्रोरेलचे ३३७ कि.मी.चे जाळे उभारण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. यानुसार, मुंबईमध्ये सध्या विविध मेट्रो मार्गांसह उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो मार्गिकेवरील मेट्रोच्या डब्यांमध्ये जागतिक स्तराची रचना करण्यात येणार असून, मेट्रोच्या डब्यांमध्ये दिव्यांगांसाठीही खास सुविधा असतील, असे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी स्पष्ट केले.

या वर्षांच्या अखेरपर्यंत मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. मुंबईमध्ये भविष्यामध्ये धावणाऱ्या मेट्रोची तुलना बंगळुरू मेट्रोशी न होता, मुंबईच्या मेट्रोची तुलना ही सिंगापूर किंवा मलेशियाच्या मेट्रोसोबत व्हावी, यासाठी या मेट्रोमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आम्ही पुरविणार असल्याचेही राजीव यांनी स्पष्ट केले. यासाठी एमएमआरडीएने अनेक जागतिक दर्जाच्या सल्लागारांची मदत स्थानकांच्या रचनेसाठी घेतली आहे. अनेक पातळीवर सल्ला घेऊन जागतिक दर्जाचे मेट्रो स्थानक मुंबई मेट्रो मार्गांवर तयार करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी दिली.

एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाºया जागतिक दर्जाच्या स्टेशनमध्ये दिशादर्शक फलक, प्रवाशांच्या सोयीने विविध चिन्हांचा वापर, प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीचे गेट, कार्यालये, लिफ्ट यांसारख्या सर्व सुविधा सर्व स्थानकाला सारख्याच राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे. यासह मेट्रो स्थानकांच्या रंगसंगतीपासून शौचालयासाठीचे दिशादर्शक फलक अशा अनेक गोष्टी प्रत्येक स्थानकांवर एकाच ठिकाणी एकाच रचनेनुसार असतील, याची काळजी घेण्यात आली आहे, असे आर.ए.राजीव यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांसाठी शौचालय, संपूर्ण मेट्रोच्या मार्गावर दिव्यांगांच्या सोयीसाठीची स्थानक रचना करण्यात आली आहे. मेट्रो स्थानक परिसरामध्ये व्हीलचेअरच्या सुविधेपासून ते अंध व्यक्तींसाठीच्या मदतीसाठी योग्य अशी स्थानकांची रचना असणार आहे.

टॅग्स :मेट्रो