उमेदवारांचा खर्चात आखडता हात
By Admin | Updated: October 12, 2014 23:06 IST2014-10-12T23:06:31+5:302014-10-12T23:06:31+5:30
निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध युक्त्या आजमावण्यात येत आहेत

उमेदवारांचा खर्चात आखडता हात
आविष्कार देसाई, अलिबाग
निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध युक्त्या आजमावण्यात येत आहेत. मात्र अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी खर्चात आखडता हात घेतल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांनी प्रचारासाठी आतापर्यंत ४ लाख ८२ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या खालोखाल शेकापचे उमेदवार सुभाष तथा पंडित पाटील यांनी खर्च केला आहे. बसपाचे उमेदवार अनिल गायकवाड यांनी फक्त १० हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी सात आॅक्टोबरपर्यंत केलेल्या खर्चाची आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. निवडणुकीतील उमेदवारीचा अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवारांना खर्चाचा तपशील परिशिष्ट १४ प्रमाणे खर्च सादर करावयाचा आहे. त्यामध्ये उमेदवारासाठी झालेली रॅली, सभा, सभेत झालेल्या चहा, नाष्टा, जेवण, मोटारसायकल, चारचाकी वाहने, झेंडे, टोप्या, खुर्च्या यासह अन्य खर्चाचा तपशील देणे अपेक्षित आहे.
४, ८ आणि ११ आॅक्टोबर अशा तीन टप्प्यात खर्चाची केलेली नोंद उमेदवारांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करावयाची होती. प्रथम ४ आॅक्टोबरच्या खर्चाचा तपशील बसपाचे अनिल गायकवाड, काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शिवसेनेचे महेंद्र दळवी, शेकापचे सुभाष तथा पंडित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. महेश मोहिते, श्रीनिवास मट्टपरती, मधुकर रामभाऊ ठाकूर, हुस्ना नैनउद्दीन हळदे या अपक्ष उमेदवारांनी खर्चाची पूर्तता न केल्याने त्यांना प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लेखी कळविले. त्यानंतर या उमेदवारांनी खर्चाची पूर्तता केल्याची माहिती सनियंत्रण विभागाने दिली.
दुसऱ्या टप्प्यातील खर्च अॅड. मोहिते यांनी ११ आॅक्टोबर रोजी सादर केला आहे, असेही या विभागाने सांगितले. तिसऱ्या टप्प्यातील खर्चाच्या तपशिलाची माहिती खर्च निरीक्षक के. ओ. मंजुनाथ यांच्या निरीक्षणानंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीत एकूण झालेला खर्च निवडणूक निकाल लागल्यानंतर ३० दिवसानंतर येणाऱ्या सात दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.