हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास
By जयंत होवाळ | Updated: February 28, 2024 21:45 IST2024-02-28T21:45:27+5:302024-02-28T21:45:42+5:30
म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयाच्या अभावी हँकॉक पुलाचे काम रखडले आहे.

हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास
मुंबई: म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयाच्या अभावी हँकॉक पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये पुलाच्या दोन मार्गिका अंशतः सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र अन्य मार्गिकांचे काम रखडले आहे. हा पूल मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रॉड स्थानकाच्या वरून जातो.
या परिसरात अनेक शाळा आहेत. पुलाचे बांधकाम रखडल्याने स्थानिकांची तसेच विशेष करून शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे. म्हाडा आणि पालिकेत समन्वय नसल्याने पुलाचे काम रखडल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे. डोंगरी आणि माझगावला जोडणाऱ्या या पुलाच्या मार्गात काही उपकरप्राप्त इमारती आहेत. त्यासंदर्भात पालिका आणि म्हाडामध्ये बोलणी सुरु आहेत. मात्र ही प्रक्रिया खूपच संथगतीने सुरु असल्याने ठोस निर्णय होत नाही. परिणामी पुलाचे काम रखडले असल्याचे समजते.
याआधी रेल्वेच्या आडमुठेपणामुळे पुलाच्या कमला खीळ बसली होती. गर्डर टाकण्याच्या वेळेस रेल्वेने काही सबबी पुढे केल्याने काम थांबले होते. २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड झाली आहे. . या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस.कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. ज्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढली आणि एकूण कंत्राट किंमत ७७ कोटी एवढी झाली.