हँकॉक ब्रिज उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

By Admin | Updated: November 17, 2015 03:15 IST2015-11-17T03:15:44+5:302015-11-17T03:15:44+5:30

भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान असलेला हँकॉक ब्रिज १८ नोव्हेंबरपासून पुन:उभारणीच्या कामासाठी तोडण्यात येणार आहे. या कामानिमित्त वाहतूक पोलिसांकडून

Hancock Bridge closed for vehicular traffic from tomorrow | हँकॉक ब्रिज उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

हँकॉक ब्रिज उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

मुंबई : भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान असलेला हँकॉक ब्रिज १८ नोव्हेंबरपासून पुन:उभारणीच्या कामासाठी तोडण्यात येणार आहे. या कामानिमित्त वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले असून, वाहनांसाठी पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य मार्गाने वाहतूक वळविताना नो पार्किंग झोनही लागू केला जाणार असल्याचे पायधुनी वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
१३५ वर्षे ओलांडलेला हँकॉक पूल जीर्ण झालेला असून, तो धोकादायक झालेला आहे. हा पूल आणि ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने मध्य रेल्वे गाड्यांना भायखळा व सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली आहे. एकूणच जुना झालेल्या या ब्रीजवर मध्य रेल्वे आणि पालिकेकडून १८ नोव्हेंबरपासून हातोडा चालविण्यात येणार असून, त्याऐवजी नवा ब्रीज बांधण्यात येणार आहे. ब्रीजचे काम पूर्ण होईपर्यंत हँकॉक ब्रीज वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे पायधुनी वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. हा ब्रीज बंद करण्यात आल्यानंतर माझगावकडून नुरबाग जंक्शनकडे येणारी वाहतूक ही नेसबिट रोडमार्गे सर जे.जे. रोडकडे जाईल. नंतर सर जे.जे. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन नुरबाग जंक्शनकडे मार्गस्थ होईल, तसेच नुरबाग जंक्शनकडे जाण्यासाठी जिनाभाई मुलजी राठोड मार्गे काकलीज चौक, पी. डिमेलो रोडवरून पुढे वाडीबंदर जंक्शनवरून एस.व्ही.पी.रोडमार्गे जाऊ शकतील.


हँकॉक ब्रीज
१८ नोव्हेंबरपासून बंद केला जाणार आहे. आमच्याकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वाहतूक पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात केले जातील. वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे.
- जी.बी. रेकुलवार (पायधुनी वाहतूक चौकी- वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

१८ नोव्हेंबरपासून हँकॉक ब्रीजचे काम सुरू केले जाईल. या ब्रीजवर नवीन गर्डर टाकण्याचे कामही होणार असून, त्यासाठी ब्लॉकची तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र, २४ तासांचा ब्लॉक घेताना अनेक लोकल गाड्या रद्द केल्या जातील.
- नरेंद्र पाटील (मध्य रेल्वे- मुख्य जनसंपर्क अधिकारी)

Web Title: Hancock Bridge closed for vehicular traffic from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.