नालासोपारा - वसई-विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘डी’मधील गाव मौजे आचोळे सर्व्हे नं. २२ ते ३२ व ८३ मधील विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावरील ३४ अनधिकृत बांधकामांवर गुरुवारपासून (दि. २३) पालिकेकडून पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात होणार आहे. या कारवाईत शेकडो कुटुंबे बेघर होणार आहेत. ही कारवाई २३, २४, २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.
कारवाईदरम्यान सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी परिसरात प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे पत्रक मंगळवारी काढले. प्रभाग समिती ‘डी’मधील डम्पिंग ग्राउंड व एसटीपी प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित भूखंडावर ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या. यातील ७ अनधिकृत इमारती नोव्हेंबरमध्ये तोडण्यात आल्या होत्या.
स्थानिकांनी केली आमदारांच्या कार्यालयात गर्दीकारवाई होणार असल्याची माहिती मिळताच ३४ इमारतींमधील रहिवाशांनी आ. राजन नाईक यांना भेटण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. कारवाई पुढे जाण्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते करणार असून, मी तुमच्यासोबत असणार आहे, असे वचन नाईक यांनी रहिवाशांना दिले.
न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेत, तसेच कायदा व सुव्यवस्था न बिघडवता कारवाई पुढे ढकलता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजन नाईक, आमदार