अर्धच जग अस्पृश्य?
By Admin | Updated: November 29, 2015 00:46 IST2015-11-29T00:46:18+5:302015-11-29T00:46:18+5:30
जिथे मासिक पाळीविषयी मोठ्याने बोललंही जात नाही, केमिस्टकडे सॅनिटरी पॅड्ससुद्धा दबक्या आवाजात मागितले जातात, केमिस्टसुद्धा कोकेन विकल्यासारखा पूर्ण बंदोबस्त करूनच ती हातात

अर्धच जग अस्पृश्य?
प्रासंगिक : विजया जांगळे
जिथे मासिक पाळीविषयी मोठ्याने बोललंही जात नाही, केमिस्टकडे सॅनिटरी पॅड्ससुद्धा दबक्या आवाजात मागितले जातात, केमिस्टसुद्धा कोकेन विकल्यासारखा पूर्ण बंदोबस्त करूनच ती हातात देतो, त्या समाजात मुली आज ‘हॅपी टू ब्लीड’ म्हणत सरेआम आंदोलनं करतायत. पॅड्स हाती घेऊन सोशल मीडियात बिनधास्त वावरतायत. त्या सगळ्याच मुली देवभोळ्या असणं शक्य नाही. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे, की नैसर्गिक क्रियेचा बाऊ करू नका. देशातल्या कित्येक देवळांची दारं स्त्रियांसाठी कधीच उघडली गेली नाहीत. केवळ दर्शन घेतल्यानं पावित्र्य, ब्रह्मचर्य नष्ट होऊ शकेल? परमेश्वरानंच जग निर्माण केलं म्हणता, मग त्या जगाचाच एक भला मोठा भाग त्याच परमेश्वराला निषिद्ध कसा ठरेल? देव जर सर्वव्यापी असेल, तर त्याला बायकांचा स्पर्श कसा टाळता येत असेल, असे काही बेसिकच प्रश्न आहेत.
ही मंदिरं कर्मठ मानसिकतेच्या अंमलाखाली तरी आहेत. पण आपल्या घरांचं काय? पाळी असेल तर पूजेला जाऊ नका, प्रसाद घेऊ नका, आपल्याच घरात, आपणच आणून बसवलेल्या देवाच्या मूर्तीपासून दूर राहा... हे आजही सररास चालतं. अनेक घरांमध्ये पाळी आलेल्या बायका-मुलींना वेगळं बसवलं जातं. गावांमध्ये तर हे चालतंच; पण शहरातल्या वन-रूम-किचनमध्येही हा प्रकार घडतो. उच्च शिक्षित महिलाही हे सारं खपवून घेतात आणि त्यांचे तेवढेच शिकलेले पती सोईस्कर डोळेझाक करतात. बरं या अपमानाला आरामाचं लेबल लावण्याचा शहाजोगपणाही असतोच. घरातल्या चार माणसांना जी गोष्ट पटवून देणं, पटलीच नाही तर स्पष्ट नकार देणं एवढी वर्षे अशक्य होतं, तीच गोष्ट साध्य करायचा प्रयत्न आज सुरू झालाय. देवळात त्या चार दिवसांतच काय, पण कधीही न गेल्यानं काहीच बिघडणार नसतं. पण म्हणतात ना, म्हातारी गेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो. या सोकावलेल्या समाजालाच आज ही विशी-पंचविशीतली पिढी आव्हान देतेय.
आपल्याकडून एखादा गुन्हा घडावा, तशा पाळीशी निगडित सगळ्याच गोष्टी लपवल्या जातात. सणवार आणि समारंभांच्या टाइमटेबलनुसार शरीराचंही टाइमटेबल अॅडजस्ट केलं जातं. टॉयलेटची गैरसोय या मुद्द्यावर तर बरेच जण बरंच बोलून झाले आहेत. आई-मुलीत संवाद नाही. गाव-खेड्यांमध्ये तर सॅनिटरी पॅड्सही परवडत नाहीत. एकूण काय, पाळी म्हणजे शरीराचे हाल. हजार आजारांना निमंत्रण! आजी देवाचं पाळायची म्हणून आई पाळते आणि आई पाळते म्हणून मीसुद्धा पाळते असं हे अंधानुकरण झिरपत आलं आणि अख्ख्या जगाच्या मुळाशी असणारी पाळी अडचण बनून राहिली. प्रश्न विचारण्याची मुभा, ते सोडवण्याची सोयच नसणाऱ्या आपल्या समाजात असं घडणं अगदीच स्वाभाविक आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा केवळ मुलींचा, बायकांचा आहे, या समजातून बाहेर पडायला हवं. मुलांच्याही पालकांनी याविषयी त्यांच्याशी बोलायला हवं. मग आपोआपच जिसंकोच दूर होतील. ज्या अंधारवाटांवर आजवरच्या पिढ्या भरकटल्या तो अंधार दूर करणारी मशाल पेटली आहे. एका मोकळ्या, स्वच्छ, आणि खऱ्याखुऱ्या जगात पुढच्या पिढ्या वाढतील अशी ग्वाही देणारा तिचा प्रकाश आश्वासक आहे.
देशविदेशांतल्या अंधश्रद्धा
आपल्याकडे जसा मासिक पाळी असलेल्या बाईचा अनारशांना किंवा लोणच्याला स्पर्श झालेला चालत नाही, तशीच अंधश्रद्धा जपानमध्येही आहे. पाळी आलेल्या बाईने सुशी मासा बनवला तर तो बिघडतो, असं त्यांना वाटतं. त्यामुळे तिथल्या हॉटेल्समध्ये सुशी बनवणारी महिला शेफ असणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
अफगाणिस्तानात पिरियडसच्या काळात अंघोळ केल्यामुळे महिलांची प्रजोत्पादन क्षमता कमी होते, असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेक संसर्ग आणि आजार होतात. झांबियामध्ये पाळी असणाऱ्या महिलांना अळणी जेवण दिलं जातं.
अफगाणिस्तानात पाळीमुळे
भुतं-खेतं आकर्षित होतात, असं मानलं
जातं. त्यामुळे तिथल्या महिला भूतबाधा होऊ नये म्हणून वापरलेली पॅड्स जमिनीत
पुरतात.
देशविदेशांतल्या अंधश्रद्धा
आपल्याकडे जसा मासिक पाळी असलेल्या बाईचा अनारशांना किंवा लोणच्याला स्पर्श झालेला चालत नाही, तशीच अंधश्रद्धा जपानमध्येही आहे. पाळी आलेल्या बाईने सुशी मासा बनवला तर तो बिघडतो, असं त्यांना वाटतं. त्यामुळे तिथल्या हॉटेल्समध्ये सुशी बनवणारी महिला शेफ असणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
अफगाणिस्तानात पिरियडसच्या काळात अंघोळ केल्यामुळे महिलांची प्रजोत्पादन क्षमता कमी होते, असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेक संसर्ग आणि आजार होतात. झांबियामध्ये पाळी असणाऱ्या महिलांना अळणी जेवण दिलं जातं.
अफगाणिस्तानात पाळीमुळे
भुतं-खेतं आकर्षित होतात, असं मानलं
जातं. त्यामुळे तिथल्या महिला भूतबाधा होऊ नये म्हणून वापरलेली पॅड्स जमिनीत
पुरतात.
हा मुद्दा फक्त मंदिर प्रवेशाचा नाही. हॅपी टू ब्लीड म्हणत आवाज उठवणाऱ्या प्रत्येकीसाठी तो श्रद्धेचाच मुद्दा असेल असंही नाही. मुद्दा प्रतिष्ठेचाही नाही. समता वगैरे सगळं ठीकच आहे. त्यासाठी भांडत खूप पुढे आलाय आपला समाज.
मुद्दा आहे तो बिनबुडाच्या, डळमळीत, मूर्ख चालीरितींना पूर्णविराम देण्याचा. सती, केशवपन, बालविवाह, हुंडा... रूढींचे हे अक्राळविक्राळ राक्षस ठार करत आलोच आहोत इथवर, तर ही उरलीसुरली कस्पटं तरी कशाला शिल्लक ठेवायची?