आधी रोपे; मग ठेकेदारांची बिले
By Admin | Updated: April 25, 2015 22:34 IST2015-04-25T22:34:33+5:302015-04-25T22:34:33+5:30
ठाणे महापालिकेने दोन वर्षांत पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. परंतु, आता हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक नवाच फंडा त्यांनी सुचवला आहे.

आधी रोपे; मग ठेकेदारांची बिले
अजित मांडके - ठाणे
ठाणे महापालिकेने दोन वर्षांत पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. परंतु, आता हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक नवाच फंडा त्यांनी सुचवला आहे. त्यानुसार, महापालिकेत जेवढे ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून वृक्षांची रोपे घेण्याचा बेत पालिकेने आखला आहे. त्यानुसार, दोन लाखांचे बिल असेल तर दोन रोपे आणि दोन कोटींचे बिल असेल तर १०० रोपे द्या, असा पालिकेचा फंडा आहे. रोपे दिली तरच बिल काढले जाईल, असेही पालिकेने या अजब फतव्यात नमूद केले आहे. या संदर्भातील शुक्रवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत धोरण मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आता ठेकेदाराला बिल काढतांना आधी पालिकेला रोपे द्यावी लागणार आहेत.
ठाणे महापालिकेने वृक्ष लागवडीचे स्पॉट निश्चित केले असून पहिल्या वर्षात २.५० लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यामध्ये पालिका एक लाख आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून दीड
लाख वृक्ष लावले जाणार आहेत. पुढच्या वर्षीदेखील अशाच पद्धतीने वृक्ष लागवड होणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रजातीच्या वृक्षांचे वय आणि उंची किती असावी, हेदेखील निश्चित झाले आहे.
४ही वृक्ष लागवड यशस्वी करण्यासाठी पालिकेने अनोखी शक्कल लढविली असून महापालिकेतील ठेकेदारांनादेखील त्यांनी वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे.
४ज्यांचे बिल २ लाख असेल, त्यांनी पालिकेला २ रोपे द्यावीत, तर ज्यांचे बिल दोन कोटींच्या वर असेल, त्यांनी १०० रोपे द्यावीत, असा फतवा काढण्याचे निश्चित केले आहे.
४विशेष म्हणजे रोपे दिली
नाही तर बिल काढणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील धोरण शुक्रवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. आता यावरील अंतिम निर्णय महासभा घेणार आहे.
४पहिल्या टप्प्यात म्हणजेच २०१५-१६ या आर्थिक वर्षात नौपाडा, उथळसर व वर्तकनगर प्रभाग समित्यांत ३५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी १ कोटी ४० लाखांची तरतूद तसेच वागळे, रायलादेवी व माजिवडा-मानपाडा प्रभाग समित्यांत ४५ हजार वृक्षांसाठी १ कोटी ८० लाख आणि कळवा, मुंब्रा व कोपरी प्रभाग समित्यांत २० हजार वृक्षांसाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
४यामध्ये सप्तपर्णी, बहावा, कदंब, महोगनी, कडुनिंब, ताम्हण, कांचन, बदाम, कैलासपती, बकुळ, बकाम नीम तसेच आपटा, करंज, शिवण आदी वृक्ष हे किमान ७ फुटांचे अंदाजित असून त्यांचे वय किमान ३ वर्षे अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच आंबा, जांभूळ, फणस, चिकू, पेरू, चिंच, काजू, नारळ, सुपारी, सीताफळ, बेल, सुरंगी, वड, पिंपळ, औदुंबर, हरडा, बेहडा, साग, रिठा, चाफा, प्राजक्त आदी वृक्ष ५ फुटांचे गृहीत धरून त्यांचे वय २ वर्षांचे अपेक्षित धरण्यात आले आहे.