अरविंद परांजपेसंचालक, नेहरू तारांगण, नेहरू सेंटर
सुमारे ५० वर्षांपूर्वी मुंबईच्या शिरपेचात नेहरू तारांगणच्या रूपाने एक मानाचा तुरा खोवण्यात आला. ३ मार्च १९७७ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते नेहरू तारांगणचे उद्घाटन झाले आणि तेव्हापासून पाच दशके ते मुंबईकरांची, मुंबईला येणाऱ्या पर्यटकांची अविरत सेवा करत आहे.
तारांगणात विविध कार्यक्रम होतात, पण मुख्य कार्यक्रम अर्थातच आकाशगृहातला. हे आकाशगृह म्हणजे ३२ मीटर व्यासाचे गोलाकार प्रेक्षागार आहे. येथे ५०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. यावर एक मोठा घुमट आहे. त्यावर ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाची आभासी प्रतिकृती विशिष्ट प्रोजेक्टरद्वारे निर्माण करता येते. बसण्याची व्यवस्था गोलाकार यासाठी आहे, कारण प्रत्येकाला आपण मोकळ्या आकाशाखाली बसलो आहे, असे वाटावे.
तारांगणचे कार्यक्रम लोकांना रटाळ वाटू नयेत म्हणून गोष्टींच्या माध्यमातून खगोलशास्त्राबद्दल माहिती देण्यात येते. अंतराळशास्त्र हा खगोलशास्त्राचा भाऊ आहे. तर अंतराळशास्त्राशी निगडीत कार्यक्रमही करण्यात येतात.
या तारांगणचे वैशिष्ट्य असे की, येथे जगातील अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. २००३ मध्ये भारतात पहिल्या डिजिटल तारांगणची सुरुवात नेहरू तारांगणात डिजीस्टार-३ पासून सुरू झाली आणि त्या नंतर येथे डिजीस्टार-६ प्रणाली लावण्यात आली. या प्रणालीचे वैशिष्ट्य असे की, पृथ्वीवरून किंवा सौर मंडळातील कुठल्याही जागेवरून आजपासून तीन हजार वर्षांपूर्वी ते तीन हजार वर्षांनंतरच्या एखाद्या दिवशी आणि एखाद्या वेळी वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांची स्थिती काय असेल, हे दाखवता येते आणि हे फक्त सौरमालेपुरते मर्यादित नाही तर आपल्याला खुद्द आपल्या आकाशगंगेपलिकडेही जाता येते.
तीन महिन्यांपूर्वी दोन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन गॅलेक्सीचा शोध लावला होता. त्याला त्यांनी ‘अलकनंदा’ असे नाव दिले. या शोधाची माहिती लगेच दोन दिवसांनी चित्रांसकट लोकांना दाखवण्यात आली.
विद्यार्थ्यांनो प्रयोग करून बघा
तारांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोगशाळा आहे. एकावेळी २० विद्यार्थी त्यांच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात दिलेले प्रयोग स्वतः करून बघू शकतात. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येतात.
लोकांसाठी विज्ञान
संस्थेची सुवर्ण जयंती त्या संस्थेसाठी महत्त्वाची असते. पण ५० हा एक आकडा आहे. लोकांसाठी विविध कार्यक्रम तयार करणे, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची पूर्तता करणे हे अव्याहतपणे सुरूच राहणार आहे.
Web Summary : Mumbai's Nehru Planetarium marks 50 years of service, offering immersive astronomy experiences. Featuring advanced technology, it showcases celestial events from the past and future, even beyond our galaxy. Workshops and a lab engage students, fostering scientific curiosity.
Web Summary : मुंबई का नेहरू तारामंडल 50 वर्षों से खगोल विज्ञान का अनुभव करा रहा है। आधुनिक तकनीक से लैस, यह अतीत और भविष्य की खगोलीय घटनाओं को दिखाता है, आकाशगंगा से परे भी। कार्यशालाएँ छात्रों में वैज्ञानिक जिज्ञासा बढ़ाती हैं।