परप्रांतीय मच्छीमारांकडून बंदीची ऐशीतैशी!
By Admin | Updated: August 12, 2014 00:25 IST2014-08-11T23:14:43+5:302014-08-12T00:25:06+5:30
आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, गुजरात आदी परराज्यातील सुमारे १५०० मच्छीमार बोटींनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी

परप्रांतीय मच्छीमारांकडून बंदीची ऐशीतैशी!
मधुकर ठाकूर, उरण
केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे १ आॅगस्टपासूनच पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, गुजरात आदी परराज्यातील सुमारे १५०० मच्छीमार बोटींनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ आॅगस्टपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र या संधीचा फायदा उठवित परराज्यातील हजारो मच्छीमार मासेमारी बंदी आदेश झुगारुन येथील मासळी राज्यातील मच्छीमारांसमक्ष लुटून नेत आहेत.
महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी मासेमारी बंदीची मुदत १५ आॅगस्टपासून संपुष्टात येत आहे. त्यामुळे मासेमारीच्या जोरदार तयारीला राज्यातील मच्छीमार लागले आहेत. मच्छीमारांची तयारीची लगबग सुरु असतानाच केंद्राच्या आदेशाप्रमाणे १ आॅगस्टपासून पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र त्याचा लाभ महाराष्ट्रातील मच्छीमारांना होत नाही. कारण केंद्राच्या आदेशाप्रमाणे १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली असली तरी राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी १५ आॅगस्टपर्यंत असल्याने खोल समुद्रातील मासेमारी करता येत नाही. अशा बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या परराज्यातील मच्छीमारांवर राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने राज्यातील मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे मात्र राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला येणाऱ्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. प्रचंड हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी आणून परराज्यातील मच्छीमार मासळी नेत आहेत. परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी पकडलेली मासळीही मुंबईच्या ससूनडॉक आणि कसारा बंदर येथे उतरुन विक्रीही करतात. अनेक परप्रांतीय बोटी मासळीची विक्रीही मुंबई येथेच करीत असल्याने मासळीची आवक वाढते. परिणामी आवक वाढल्याने मासळीचे भाव घसरतात. एकाच परवान्यावर अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी मासळीचा व्यवसाय करीत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणाही धजावत नसल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे.
मुंबईच्या ससूनडॉक बंदराची मच्छीमार बोटी लागण्याची क्षमता ८५० तर कसारा बंदराची क्षमता १२५० मच्छीमार बोटींची आहे. मात्र परप्रांतीय मच्छीमारही मुंबईच्या आश्रयाला येऊ लागल्याने दोन्ही बंदरात मोठी गर्दी होऊ लागली आहे. मात्र परप्रांतीय मच्छीमारही मुंबईच्या मच्छीमार बोटींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे.