समाजातील प्रत्येक प्रसंग आणि घटनांचे निरीक्षण करण्याची सवय: डॉ. रवींद्र शोभणे
By रेश्मा शिवडेकर | Updated: February 27, 2024 20:30 IST2024-02-27T20:29:32+5:302024-02-27T20:30:03+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या आपल्या निवडीचे सर्व श्रेय हे अभिजात मराठी रसिक वाचकांना असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक प्रसंग आणि घटनांचे निरीक्षण करण्याची सवय: डॉ. रवींद्र शोभणे
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शालेय जीवनापासून समाजातील प्रत्येक प्रसंग आणि घटनांचे निरीक्षण, त्याकडे तटस्थ पाहण्याची सवय होती. त्यातून लेखनाला सुरुवात केली. पुढे कथा, कादंबरी, ललित लेखन, समीक्षा, अनुवादीत साहित्य आणि भाषांतरीत साहित्यातून वाचकापर्यंत पोहचलो, असे प्रतिपादन ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. आपण जी काही साहित्य संपदा तयार करू शकलो ती लहानपणापासून जपलेल्या आणि जडलेल्या वाचन आणि लेखनाच्या आवडीमुळेच असेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात डॉ. शोभणे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयु भाटकर यांनी डॉ. शोभणे यांची मुलाखत घेतली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.
आपले अनुभव सांगताना डॉ. शोभणे पुढे म्हणाले, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीशिवाय कोणालाच यशाचा मार्ग सापडत नाही. संवेदनशीलतेने विचार करताना आपल्या हातून जे लेखन घडते त्यातून वाचकाला मनस्वी आनंद कसा मिळणार याचे भान लेखकाला हवे. केवळ मराठीचे अभ्यासक आणि शिक्षक उत्तम लेखक होऊ शकतात असे नाही. समाजातल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती ज्याला वाचनाची व लेखनाची आवड आहे, स्पंदन टिपण्याची सवय आहे, ज्याची निरीक्षण शक्ती प्रतिभावंतांची आहे, त्या प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो. आपल्या प्रत्येक लेखनातून समाजाच्या घटना, समस्या आणि विचार यांचे प्रतिबिंब कसे पडेल हे पाहणे काळाची गरज आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या आपल्या निवडीचे सर्व श्रेय हे अभिजात मराठी रसिक वाचकांना असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली.