गायमुख होणार पर्यटनस्थळ
By Admin | Updated: July 7, 2015 00:52 IST2015-07-07T00:52:02+5:302015-07-07T00:52:06+5:30
ठाणे महापालिका, महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळ व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने गायमुख येथे उभारण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळाच्या कामाला अखेर पर्यावरण खात्याने ग्रीन सिग्नल दिला आहे

गायमुख होणार पर्यटनस्थळ
ठाणे : ठाणे महापालिका, महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळ व मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने गायमुख येथे उभारण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळाच्या कामाला अखेर पर्यावरण खात्याने ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच मेरीटाइम बोर्डाने संबंधित ठेकेदारास प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीकिनाऱ्याजवळील मेरीटाइम बोर्डाची मालकी असलेल्या जागेवर पर्यटनस्थळ विकसित करता येऊ शकते, असे मान्य केले होते. त्यानुसार, या परिसराचा विकास करून ठाणे शहरातील नागरिकांना एक चांगल्या प्रकारचे पर्यटनस्थळ मिळणार आहे.
शहरातील प्रामुख्याने घोडबंदर परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार असून भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या खाडीकिनारी धार्मिक विधीदेखील केले जातात. पर्यटन विकास विभागाने विकास केल्यास धार्मिक कार्यालादेखील येथे उत्तम जागा मिळणार आहे. तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार असल्याने हे स्थळ पर्यटनाला चालना देणारे ठरणार असल्याची माहिती यासाठी प्रयत्न करणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या जागेवर मेरीटाइम बोर्ड व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जेटी, हाऊसबोट, साहसी क्रीडा संकुल तसेच रेस्टॉरंट उभारून या भागाचा विकास करण्यात येणार आहे. तसेच गायमुख बंदराला लागून ६० मीटरचा पट्टा हा स्पीड बोटीसाठी विकसित करण्यात येणार असून मीरा-भार्इंदर, वसई-विरार, कोलशेत, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या भागांत जलवाहतूक करण्यासाठी याचा उपयोग होईल.
या प्रकल्पासाठी येणाऱ्या अंदाजे १३ कोटी ८ लाखांची तरतूद ठाणे महापालिकेने अंदाजपत्रकात केली असून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडूनही आवश्यक निधी दिला जाणार आहे. हा प्रकल्प सुरू केल्यापासून १८ महिन्यांत तो मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)
गायमुख पर्यटनस्थळ विकसित करत असताना खाडीकिनारी रेती व्यवसाय करणाऱ्या प्रामुख्याने डुबी पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांचा व्यवसाय कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तसेच त्यांच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारे गदा येणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.