Join us  

Raj Thackeray: “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 4:16 PM

Raj Thackeray: बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत, या शब्दांत गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देजो बोलण्यावर ठाम नाही, त्याच्यासोबत चर्चा करुन वेळ फुकट घालवत नाहीबाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसतेहिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल, तर मनसेने भाजपासोबत जायला हवे

मुंबई: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचन गिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांच्यासह सूर्याचार्याजी हेही यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे आणि अयोध्येहून आलेल्या महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात, असे त्या म्हणाल्या.

जो बोलण्यावर ठाम नाही, त्याच्यासोबत चर्चा करुन वेळ फुकट घालवत नाही. जे बोलण्यावर ठाम आहेत, त्यांच्यासोबतच आम्ही आहोत. राज ठाकरे यांना आधिपासून ओळखते. बाळासाहेब ठाकरे यांचीही एकदा भेट घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत, या शब्दांत गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. 

राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार

राज ठाकरे यांचा डिसेंबर महिन्यात अयोध्येत येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचे स्वागत करू. राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच्या कार्याला हातभार लावावा, अशी विनंती त्यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांच्या हिंदू राष्ट्राबाबतच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत. स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर ते बोलत असतात. परप्रांतियांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही, असे गुरु माँ कांचन गिरी यांनी सांगितले. 

मनसेने भाजपासोबत जायला हवे

राज ठाकरे यांच्याशी उत्तर भारतीयांबाबत बोलले. त्याच्या मनात उत्तर भारतीयांबाबत द्वेषभावना नाही, हे मला जाणवले. उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुंबई आलेल्यांनी निश्चिंत राहावे, असे सांगताना मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. राजकाराणाबाबत मला माहिती नाही. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल, तर मनसेने भाजपासोबत जायला हवे. कारण देशात सध्या नवे हिंदुत्व जन्माला येतेय आणि हे नवे हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवे, असे त्या म्हणाल्या.   

टॅग्स :राज ठाकरेबाळासाहेब ठाकरेमुंबई