लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रसिद्ध कवी-गीतकार गुलजार यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेल्या ५८व्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरुवारी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे गुलजार मागच्या आठवड्यात नवी दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना राहत्या घरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय ज्ञानपीठचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर. एन. तिवारी यांनी गुलजार यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रशस्तिपत्रक, ११ लाख रुपये रोख आणि वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दुपारी आम्ही गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटलो. यावेळी त्यांचे जावई गोविंद संधू, चित्रपट निर्माते संगीतकार विशाल भारद्वाज, त्यांची पत्नी रेखा आणि इतर साहित्यिक उपस्थित होते, असे तिवारी यांनी सांगितले.
याआधी गुलजार यांना २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण, २००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील ‘जय हो...’ या गाण्यासाठी अकादमी व ग्रॅमी पुरस्कार आणि भारतीय चित्रपट उद्योगातील योगदानासाठी २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.