पालघरातील मच्छीमारांवरील गुजरातची दादागिरी वाढणार?
By Admin | Updated: November 10, 2014 01:07 IST2014-11-10T01:07:51+5:302014-11-10T01:07:51+5:30
महाराष्ट्राच्या विशेषत: वसई पालघर, डहाणू सागरीक्षेत्रात गुजरातच्या मच्छीमारांकडून होणारे अतिक्रमण सध्या वाढले असून त्याचा फटका या जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसतो आहे.

पालघरातील मच्छीमारांवरील गुजरातची दादागिरी वाढणार?
पालघर : महाराष्ट्राच्या विशेषत: वसई पालघर, डहाणू सागरीक्षेत्रात गुजरातच्या मच्छीमारांकडून होणारे अतिक्रमण सध्या वाढले असून त्याचा फटका या जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातने हा प्रकार टाळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले असून आता तर केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र असे भाजपचे सरकार असल्याने गुजराती मच्छीमारांची दादागिरी या सागरीक्षेत्रात अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री सवरा आणि खासदार वनगा हे या मच्छीमारांची पाठराखण कशी करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील मच्छीमारी व्यवसाय हा सुसंघटीत नाही त्याला उद्योगाचा दर्जा नाही, पतपुरवठ्याच्या सोयी नाही त्यामुळे खोल सागरीक्षेत्रात जाऊन मासेमारी करण्यासाठी लागणारी महागडी जहाजे तो घेऊ शकत नाही. परिणामी त्याला किनारा आणि त्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावरील सागरी क्षेत्रात मच्छीमारी करणे भाग पडते. त्याच्याकडून वापरली जाणारी जाळीही सामान्य अथवा मध्यम प्रतीची असतात हे लक्षात घेऊन गुजरातचे धनदांडगे मच्छीमार आपली महाकाय जहाजे या जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात घुसवून येथील मत्स्यधन गेली अनेक वर्षे लुटून नेत असतात. विशेष म्हणजे या जहाजांवर राबणारे ९० टक्के खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असतात. म्हणजे सागरी क्षेत्र या जिल्ह्याचे मच्छीमारी करणारे या जिल्ह्यातले पण केवळ हाती पैसा आहे म्हणून व खोल सागरातील मच्छीमारी करणारी जहाजे आहेत म्हणून त्यातील समृद्धी गुजराती मच्छीमारांची अशी अवस्था आहे.
इतके दिवस महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा केंद्र सरकार आणि गुजरात सरकारकडे याबाबत चर्चा केल्या परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही आता तर गुजरातमध्ये, महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे गुजराती मच्छीमारांकडून होणारी महाराष्ट्रातल्या विशेषत: पालघर मधल्या मत्स्यधनाची चोरी वाढण्याची भीती मच्छीमार व्यक्त करीत आहेत. विशेषत: डहाणूमधून भाजपचे पास्कल धनारे हे आमदार झाले आहेत. या किनारपट्टीचे प्रतिनिधीत्व पालघरचे खासदार चिंतामण वनगा हे करीत आहेत. तेही भाजपचे आहेत. अशा स्थितीत ते या जिल्ह्यातल्या मच्छीमारांचे हितसंबंध राखणार की नाही असा प्रश्न या पट्ट्यातील मच्छीमार उपस्थित करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)