डहाणूच्या रुग्णांना गुजरातचा आधार

By Admin | Updated: April 27, 2015 22:45 IST2015-04-27T22:45:08+5:302015-04-27T22:45:08+5:30

तालुक्यात दोन महिन्यांपासून टायफाईड, क्षयरोग तसेच मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले

Gujarat's base for Dahanu patients | डहाणूच्या रुग्णांना गुजरातचा आधार

डहाणूच्या रुग्णांना गुजरातचा आधार

डहाणू : तालुक्यात दोन महिन्यांपासून टायफाईड, क्षयरोग तसेच मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले असून आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना गुजरात येथील वापी, बलसाडच्या शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. हे टाळण्यासाठी डहाणूसारख्या आदिवासी भागात रुग्णालय सुरू करण्याची मागणी होत आहे.
डहाणू तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाख असून येथील चिंचणी, चंद्रनगर, घोलवड, कासा, गंजाड, धुंदळवाडी, सायवन, अशागड आदी ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर ग्रामीण भागात १८ उपकेंद्रे आहेत. येथे दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु येथे क्ष-किरणयंत्र, सोनोग्राफी, तज्ज्ञ डॉक्टर तसेच महागडा औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी डहाणूत पाठविले जाते. डहाणू, कासा येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. तर वानगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथेही परिस्थिती वेगळी नाही. एमआरय, सीटीस्कॅन, रक्तसाठा नसल्याने रुग्णांना ठाणे, मुंबई, वापी, बलसाड येथे जाण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई, ठाणे हे डहाणूपासून तीन तासाचा अंतरावर असल्याने रुग्णांना घेऊन वापी किंवा बलसाड येथील शासकीय रुग्णालयात जातात. अनेक वेळा तर, रस्त्यातच अनेक रुग्ण दगावल्याच्या घटनानाही घडल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आच्छाड ते चारोटी नाका दरम्यान अपघात झाल्यास जखमींना वापी किंवा बलसाड येथे घेऊन जावे लागते.
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने मागील काही वर्षांपासून गुजरात राज्यातील नगरपालिका तसेच स्वयंसेवी संस्थांची रुग्णालये येथील नागरिकांचा आधार ठरत आहेत.

Web Title: Gujarat's base for Dahanu patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.