Join us  

अंबानींच्या निवासस्थानाची चौकशी करणारे गुजरातचे; मुंबई दर्शनादरम्यान पत्ता विचारल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 8:14 AM

चालकाच्या चौकशीतून समोर

मुंबई : उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाविषयी संशायास्पदरीत्या चौकशी करणाऱ्या प्रवाशांच्या कारचालकाला मुंबई पोलिसांनी  मंगळवारी नवी मुंबईतून ताब्यात घेत चौकशी केली. कारमधील प्रवासी गुजरातचे असून, ते मुंबई फिरण्यासाठी आले होते, अशी माहिती चालकाच्या चौकशीतून  समोर आली आहे. 

टॅक्सीचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ला कोर्ट परिसरात थांबलो असताना, एक कार बाजूला येऊन थांबली. त्यामध्ये असलेल्या दोन प्रवाशांनी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाविषयी चौकशी केली. दोघेही उर्दूमध्ये बोलत होते. त्यांच्याकडे बॅगही होत्या. त्यांची चौकशी संशयास्पद वाटल्याने टॅक्सीचालकाने याबाबत तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षात कॉल करून माहिती दिली. या कॉलमुळे  अंबानी यांच्या अंँटालिया निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. चालकाने दिलेला वाहन क्रमांक चुकीचा असल्याने पथकाने सीसी टीव्हीच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. 

तपासात ही कार नवी मुंबईतील असल्याचे समजले. त्यानुसार, पथकाने सोमवारी रात्री उशिराने नवी मुंबईतून चालकाला ताब्यात घेत चौकशी केली. चालकाने दिलेल्या माहितीत, कारमधील तीन प्रवासी त्याच्या मित्राचे नातेवाईक आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. ते मुंबई फिरण्यासाठी आले होते. सोमवारी मुंबईत फिरत असताना त्यांचा मोबाइल मॅपमध्ये काही तरी बिघाड झाला. तेथे उभ्या असलेल्या टॅक्सीचालकाकडे त्यांनी चौकशी केल्याचे सांगितले.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर ते गुजरातला निघून गेले. चालकाने दिलेल्या माहितीची पोलिसांकडून खातरजमा करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात कुठल्याही प्रकारे संशयास्पद हालचाली दिसून येत नसल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीनंतर चालकाला सोडण्यात आले आहे.  तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीपोलिस