Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत गुजरातचा सिंह येणार, तो सुद्धा जोडीने...; जिजामाता प्राणिसंग्रहालयात लवकरच घुमणार गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:51 IST

गुजरातचे प्राणिसंग्रहालय देणार सिंहाची जोडी, सिंहाची जोडी मिळावी म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरात प्राणिसंग्रहालयाकडे पाठपुरावा केला होता.  त्यासाठी त्या प्रसंगी गुजरातलाही जाणार होत्या. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : वनराजांच्या आगमनाने भायखळ्याच्या  वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा रुबाब येत्या काही दिवसांत आणखी वाढणार असून  लवकरच आशियाई सिंहांची गर्जना मुंबईकराना  ऐकू  येईल. गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने जिजामाता प्राणिसंग्रहालयाला २ नर आणि २ मादी आशियाई सिंह देण्यास तत्त्वतः तयारी दर्शविली आहे.

सक्करबाग प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी ६ मे  रोजी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात हा प्रस्ताव मान्य असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या देवाण-घेवाणीसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि संबंधित सक्षम प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक राहणार आहे. सक्करबाग प्रशासनाने बदल्यात प्राणिसंग्रहालयाने २ नर व २ मादी जिराफ किंवा १ नर व १ मादी भारतीय एकशिंगी गेंडा, अथवा ३ नर व ३ मादी कॅपुचिन माकडे देण्याची मागणी केली आहे. पत्रात पेंग्विनची मागणी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ तसेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पशुवैद्यकीय तपासणी, विलगीकरण, वाहतूक आणि इतर वैधानिक बाबींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. राणीबागेत सध्या विविध विदेशी आणि भारतीय प्राण्यांचे आकर्षण असले तरी आशियाई सिंह आल्यास पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे वन्यजीवप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

महापौरांनी केले होते प्रयत्न 
सिंहाची जोडी मिळावी रस्ताही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरात प्राणिसंग्रहालयाकडे पाठपुरावा केला होता.  त्यासाठी त्या प्रसंगी गुजरातलाही जाणार होत्या. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

पेंग्विनची मागणी नाही 
गुजरात प्राणिसंग्रहालयाने सिंहाच्या मोबदल्यात अन्य प्राणी मागतानाच,  आमची पेंग्विनसाठी मागणी नाही, असे स्पष्ट केले आहे. 
दरम्यान,  सिंहाच्या देखभालीसाठी मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात पुरेशी व्यवस्था नसल्याचा गुजरात प्राणिसंग्रहालयाचा सुरुवातीला सूर होता. मात्र, आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे, अशी ठाम भूमिका जिजामाता प्राणिसंग्रहालयाने घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Asiatic Lions to Arrive in Mumbai Zoo from Gujarat

Web Summary : Mumbai's Jijamata Zoo will soon welcome a pair of Asiatic lions from Gujarat's Sakkarbagh Zoo. The exchange awaits approvals. Mumbai may trade giraffes, rhinos, or capuchin monkeys in return. The zoo secured the lions after persistent efforts.
टॅग्स :मुंबई