Join us

गुजरातच्या सराफाचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न, अमेरिकन व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली ४४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 09:29 IST

तणावातून त्यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये झोपेच्या १६ ते १७ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

मुंबई : अमेरिकन व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली गुजरातच्या सराफाची ४४ लाखांची फसवणूक करण्यात आली. पैसे परत न करता दुकलीने त्यांना मानसिक त्रास देत  जीवे मारण्याची धमकी दिली. याच, तणावातून त्यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये झोपेच्या १६ ते १७ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नासिर शेख , मुन्ना शेख आणि जैदी सय्यद विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये आरोपींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचाही वापर करत पैसे लाटले. गुजरातचे रहिवासी असलेले उमर अन्वरभाई मेमन (३१) या सराफाची यामध्ये फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मित्र श्याम शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना जावेद सय्यद याच्या वांद्रे येथील घरी बोलावले. तेथे त्यांची नासीर शेखसोबत ओळख झाली.

शेखने, मिनिस्ट्रि व्हिसाचे काम कररून देतो सांगताच, त्यांनी अमेरिकेचा मिनिस्ट्रि व्हिसा काढायचा असल्याबाबत त्याला सांगितले. त्याने, ४४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, ५ नोव्हेंबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२२ दरम्यान ३१ लाख २८ हजार रुपये त्यांना पाठवले.  आठवडाभराने वांद्रे येथे शेख व त्याचा भाऊ मुन्नाभाईजवळ उर्वरित १२ लाख ७२ हजार रुपयांची रोकड दिली. मात्र, बरेच दिवस उलटूनही काम  होत नसल्याने त्यांनी २५ डिसेम्बर रोजी नासिरकडे  चौकशी केली. त्याने, काम झाले नसून पैसे परत देतो सांगून एक महिन्याचा वेळ मागितला.

तसेच, याचा पुरावा म्हणून  कोर्टाकडून बॉण्ड लिहून त्यामध्ये आतापर्यंत ४४ लाख रुपये दिल्याचे नामूद केले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने जैदी सय्यद नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने तो अमित शहा यांच्या डेलिगेशनचे मंत्रालयातून मिनीस्ट्री व्हिसाचे काम ७  फेब्रुवारीपर्यंत करून देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानेही काम केले नाही. पुढे, दोघांकडे पैसे परत मागताच त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नासिर, मुन्ना आणि जैदीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

थोडक्यात वाचले...१६ मार्च रोजी जैदी आणि शेख यांनी मेमन यांना वांद्रे परिसरात बोलावून घेतले. तेथेही पैसे न देता मेमन यांना शिवीगाळ केली. याच तणावातून १८ मार्च रोजी त्यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये झोपेच्या गोळ्या खाल्या. याबाबत शिंदे आणि सय्यदला कॉल करून त्यांनी सांगितले. शिंदे व सय्यद यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे वेळीच दाखल केल्यामुळे मेमन थोडक्यात वाचले.

टॅग्स :मुंबई