Join us

जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:01 IST

मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ४७४.४६ कोटींचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी मंडळाने ४०० कोटींचा विमा काढला होता. या विम्यामध्ये दर्शनाला येणाऱ्या भाविकांचाही समावेश आहे.

मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे हा विमा उतरवण्यात आला आहे. सोने-चांदीचे दागिने, वैयक्तिक अपघात विमा, आग, भूकंपासारख्या आपत्ती तसेच सार्वजनिक जबाबदारी यांचा या विम्यात समावेश आहे. यातील ३७५ कोटींचा हिस्सा वैयक्तिक अपघात विम्यासाठी आहे.

त्यामध्ये स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी व सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. विम्याच्या एकूण रकमेपैकी ६७ कोटींचा विमा सोने-चांदीच्या दागिन्यांचा आहे. तर पंडाल, स्टेडियम व भाविकांचा ३० कोटींचा विमा काढण्यात आला आहे.

सेल्फ सर्व्हिस किऑस्क

यंदा सेल्फ सर्व्हिस किऑस्क युनिट्स मुख्य प्रवेशद्वारावर उभारले असून, भक्तांना पूजा, सेवेची बुकिंग सुलभपणे करता येणार आहे. स्कॅन अँड ऑफर सेवा, पूजा सुविधा सुरू करण्यात आली आहे. सामान्य मुखदर्शनासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.

गर्दी नियंत्रणासाठी एजन्सी

जीएसबी मंडळात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय गणेशोत्सव आहे. मंडळाने गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक केली असून दर्शन व्यवस्थेतही बदल केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. खासगी एजन्सीद्वारे ८७५ कर्मचारी कार्यरत असून, १०० सीसीटीव्ही, एआय-आधारित फेसियल रेकग्निशन कॅमेरे व मेटल डिटेक्टर गेट्स बसविले आहेत.

दर्शनासाठी एलिव्हेटेड स्कायवॉकचा वापर

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एलिव्हेटेड स्कायवॉकद्वारे दर्शन दिले जाईल, परिणामी कमाल दीड तासात भाविक दर्शन घेऊन बाहेर पडू शकतील. रांगेत उभ्या भाविकांच्या सोयीसाठी एसी लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिली.. जीएसबी मंडळाच्या गणेशमूर्तीला ६६ किलो सोन्याचे दागिने आणि ३३६ किलो चांदीने सजवले जाते, असे पै म्हणाले. भक्तांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आल्याचे पै म्हणाले.

टॅग्स :गणेशोत्सव 2025