वाढवण बंदराचा गुप्त सर्व्हे सुरु
By Admin | Updated: May 14, 2015 22:58 IST2015-05-14T22:58:31+5:302015-05-14T22:58:31+5:30
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य मेरीटाईम बोर्डामार्फत वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात

वाढवण बंदराचा गुप्त सर्व्हे सुरु
डहाणू : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य मेरीटाईम बोर्डामार्फत वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून त्याला सरकारने हिरवा कंदील दाखविल्याचे वृत्त आहे. प्राथमिक तयारी म्हणून जमीन संपादीत करण्याचा सर्व्हे अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. पंधरा वर्षापूर्वी जनतेच्या आक्रमक पवित्र्याने तसेच उच्च न्यायालयाच्या दणक्याने रद्द करण्यात आलेले येथील बंदर शिवशाही सरकारने रद्द केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या बंदराने पुन्हा डोके वर काढले आहे.
यासाठी लागणाऱ्या संभाव्य जमीनीच्या सर्व्हेचे काम मुंबईच्या सिन्टेक्स कंपनीकडे दिले आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागातील ज्येष्ठ निवृत्त कर्मचाऱ्यांची ही कंपनी असून त्यांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून वरोर आणि बाडा पोखरण तलाठी समवेत बंदरासाठी लागणारी संभाव्य जमीन संपादीत करण्याबरोबरच येथील खाजगी, शासकीय, जमिनीचे सातबारे उतारे, नकाशे, घेण्याचे काम दोन, तीन दिवसांपासून सुरू केले आहे.
वाढवण, टिघरेपाडा आणि बाडापोखरण परिसरातील जमिनीच्या पाहणीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने बंदर होणार, अशी चर्चा सध्या गावागावांत सुरू आहे. तत्कालीन शिवशाही सरकारने बंदर रद्द करण्याची घोषणा केली. आता पुन्हा बंदल होणार अशी चर्चा सुरु झाल्याने वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती याला विरोध करणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले.
(वार्ताहर)